बेस्टचे प्रवासी सहा लाखांनी घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 04:26 AM2018-06-29T04:26:52+5:302018-06-29T04:26:54+5:30
आधीच आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला आणखी एक झटका बसला आहे. गेल्या वर्षभरात बेस्ट बसगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवासीसंख्येत तब्बल सहा लाख घट झाली
मुंबई : आधीच आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला आणखी एक झटका बसला आहे. गेल्या वर्षभरात बेस्ट बसगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवासीसंख्येत तब्बल सहा लाख घट झाली आहे. यामुळे ११२ कोटी रुपये उत्पन्नही घटल्याचे बेस्ट समितीच्या बैठकीत गुरुवारी समोर आले. तसेच ई-तिकीट देणाºया मशीन मोठ्या प्रमाणात नादुरुस्त असल्याने बेस्टचे नुकसान होत असल्याचा आरोप करीत बेस्ट समिती सदस्यांनी या प्रकरणी महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्यावर निशाणा साधला.
बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून २००९ मध्ये ४३ लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. मात्र बंद पडणाºया बस, शेअर रिक्षा, मेट्रोच्या स्पर्धेत गेल्या दशकभरात बेस्टच्या प्रवाशांमध्ये घट होत आहे. परिणामी बेस्टचा प्रवासीवर्ग आता २२ लाखांपर्यंत घसरल्याची माहिती बेस्ट समितीमध्ये सदस्यांनी दिली. बेस्ट उपक्रमाने काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ट्रायमॅक्स या मशीन सतत नादुरुस्त होत असून याचा फटका प्रवासीसंख्येला बसत आहे. यामुळे वर्षभरात ११२ कोटी उत्पन्न कमी झाले. यास महाव्यवस्थापक जबाबदार आहेत, असा आरोप सुनील गणाचार्य यांनी केला.
बेस्टच्या ताफ्यात सध्या ३,३०० बसगाड्या असून रस्त्यावर फक्त २८०० बसगाड्या धावतात. त्यातच शेअर रिक्षा-टॅक्सी यामुळेही प्रवासीसंख्या कमी होत आहे. ट्रायमॅक्स मशीनची मुदत ३० जून रोजी संपत असल्याने त्यानंतर तिकिटाचा दुसरा पर्याय काय, असा सवाल अनिल कोकीळ यांनी उपस्थित केला. मात्र प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यावर भर दिला जात आहे. महसूल वाढवण्याचे प्रयत्नही सुरू असून ट्रायमॅक्स मशीनची मुदत सहा महिने वाढवण्यात येईल, असे बागडे यांनी सांगितले.
प्रशासनाचे युक्तिवाद
प्रवासीसंख्येत सात वर्षांमध्ये ४० टक्क्यांनी घट
२००९-२०१० मध्ये ४३ लाख ७० हजार प्रवासी संख्या होती, २०१८ मध्ये २५ लाख ९० हजार एवढे प्रवासी उरले. आता ही संख्या २२ लाखांपर्यंत घसरल्याचे समोर आले आहे.
बेस्टच्या दर्शनी बाजूला असलेले इलेक्ट्रॉनिक बोर्ड बंद असणे, कंडक्टरकडे असणाºया ट्रायमॅक्स मशीनमध्ये बिघाड, तिकीट प्रणाली सदोष, कमी झालेल्या बसफेºयांमुळे प्रवासीसंख्येत घट झाली आहे.
तिकीट मशीन बंद असल्याने महसुलात घट होत आहे, मात्र प्रवासी कमी झालेले नाहीत, असा युक्तिवाद प्रशासन करीत आहे.
आकडेवारी कोटींमध्ये
वर्ष उत्पन्न खर्च तूट
१९८०-८१ ५४.१५ ६६.९० १२.८३
१९८७-८८ १२०.४१ १५६.३३ ३५.९१
१९९७-९८ ५३८.२४ ६४०.४० १०२.१५
२००७-०८ ८५४.८८ १२२६.६९ ३७१.८०
२०१७-१८ १७५३.५३ २७९९.४४ १०४५.९१
वर्ष प्रवासीसंख्या
२००९-१० ४३.७
२०१३-१४ ३५.८
२०१५-१६ २८.३
२०१७-१८ २५.९