मुंबई- 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा डोळ्यांसमोर ठेवून बेस्ट अनोखा उपक्रम राबवणार आहे. या उपक्रमांतर्गत बेस्टकडून परीक्षार्थी विद्यार्थ्यांना विशेष सवलत देण्यात येणार आहे. 21 फेब्रुवारी 2018 ते 20 मार्च 2018दरम्यान 12वीच्या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. तर 1 मार्च 2018 ते 24 मार्च 2018 दरम्यान दहावीच्या परीक्षा होणार आहेत. परीक्षा कालावधी दरम्यान परीक्षेला दाखल होणाऱ्या विद्यार्थ्याच्या सोयीकरिता बेस्ट उपक्रमांतर्गत अनेक सुविधा देण्यात येणार आहेत, अशी माहिती बेस्टचे जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोफणे यांनी दिली आहे. परीक्षा कालावधीमध्ये बसपासधारक विद्यार्थ्याचे बसपास त्यांचे निवासस्थान आणि परीक्षा केंद्र या दरम्यान वैध मानण्यात येतील. सदर विद्यार्थ्याना वेगळे प्रवाशी तिकीट घ्यावे लागणार नाही. परीक्षा कालावधीमध्ये महापालिका विद्यार्थी - ज्यांच्याकडे बसपास उपलब्ध नाहीत, अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या प्रवेशपत्रावरील शाळेचा शिक्का पाहून संबंधित विद्यार्थी महापालिका शाळेचा विद्यार्थी असल्याची खात्री करून पूर्ण प्रवासभाडे न आकारता सवलतीचे प्रवासभाडे आकारण्यात येईल. परीक्षा कालावधीमध्ये परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बसगाडीमध्ये पुढील प्रवेशद्वाराने प्रवेशाची मुभा राहील.परीक्षार्थी विद्यार्थ्याना प्राधान्याने बससेवा उपलब्ध होईल, याकरिता गर्दीच्या बसथांब्यावर अधिकारी/पर्यवेक्षकीय कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच शालेय व्यवस्थापनाकडून सूचना आल्यास अतिरिक्त बसगाड्यांचे प्रवर्तन देखील करण्यात येणार आहे. सर्व प्रवासी जनतेने विशेषतः परीक्षार्थी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी बेस्ट उपक्रमातर्फे उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांची नोंद घेऊन प्रवास करावा.
10वी आणि 12वीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी बेस्टचा अनोखा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 2:11 PM