संकटातून बाहेर पडण्याचा सापडेना ‘बेस्ट’ मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:06 AM2019-12-16T00:06:09+5:302019-12-16T00:06:12+5:30

२२४९ कोटी रुपयांची तूट : २१०० कोटी रुपये दिल्यानंतरही ‘बेस्ट’ची झोळी रिकामी; आर्थिक तूट भरून काढण्याचे आवाहन

The best way to get out of trouble | संकटातून बाहेर पडण्याचा सापडेना ‘बेस्ट’ मार्ग

संकटातून बाहेर पडण्याचा सापडेना ‘बेस्ट’ मार्ग

googlenewsNext

शेफाली परब-पंडित ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पालकत्व स्वीकारत महापालिकेने आर्थिक साहाय्य केल्यामुळे डबघाईला आलेल्या बेस्ट उपक्रमाला आशेचा किरण दिसला. मात्र अनुदान आणि कर्जस्वरूपात २१०० कोटी रुपये दिल्यानंतरही ‘बेस्ट’ची झोळी रिकामी आहे. तब्बल २२४९ कोटी रुपयांची तूट सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात दर्शविण्यात आली आहे. बस आगारांमध्ये खासगी पार्किंग, भाडे तत्त्वावर मिनी, मिडी, वातानुकूलित बस सेवा, निम्मे कर्ज फेडूनही बेस्ट उपक्रमाची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. सुधारित वेतन करार, कर्मचाऱ्यांचा तुटवडा, एक हजाराहून अधिक बसगाड्या भंगारात निघाल्याने बस सेवेवर परिणाम, नवीन बस ताफ्यात येण्यास दिरंगाई अशा अडचणींचा सामना बेस्ट उपक्रम करीत आहे. त्यामुळे मुंबईची ही दुसरी जीवनवाहिनी अद्याप ‘बेस्ट’ होण्याची चिन्हे नाहीत.


भाडेकपातीचा आर्थिक फटका
जुलै २०१९ पासून बेस्ट उपक्रमाचे प्रवासी भाडे किमान पाच ते कमाल २० रुपये करण्यात आले. यामुळे प्रवासी संख्या १७ लाखांवरून थेट ३३ लाखांवर पोहोचली. मात्र उत्पन्नातही मोठी घट झाली. वार्षिक २४० कोटी रुपये नुकसान होत असल्याचा मोठा आर्थिक फटका उपक्रमाला बसत आहे. त्यामुळे वातानुकूलित बसगाड्यांचे भाडे वाढविण्याची मागणी पुढे येत आहे.
नियोजनाअभावी यश नाही
तूट कमी करण्यासाठी पालिकेच्या शिफारशीनुसार भाडेतत्त्वावर बसगाड्या चालविण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला. भाडेकपात केल्यानंतर तीन महिन्यांत बसगाड्यांचा ताफा सात हजारांपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य बेस्टने ठेवले होते. त्यानुसार एक हजार मिडी-मिनी बसगाड्या भाड्याने घेण्याचा प्रस्ताव विधानसभा निवडणुकीपूर्वी घाईघाईने मंजूर करण्यात आला. मात्र आतापर्यंत केवळ ५५ मिनी-मिडी वातानुकूलित बसगाड्या १२ मार्गांवर चालविण्यात येत आहेत. तर एकूण २० बस मार्गांवर वातानुकूलित बससेवा सुरू आहेत.


डबलडेकर होणार इतिहासजमा...
१९३७ मध्ये पहिली डबलडेकर बसगाडी बेस्टच्या ताफ्यात आली. या बसगाडीचे प्रचंड आकर्षण मुंबईकरच नव्हे तर बाहेरून येणाºया पर्यटकांनाही आहे. मात्र अरुंद रस्ते, पूल-स्कायवॉक, मोनो-मेट्रो या स्पर्धेत डबलडेकर कालबाह्य झाली. सध्या दहा बसमार्गांवर १२० डबलडेकर बसगाड्या चालविण्यात येत आहेत. यापैकी पुढील वर्षभरात ७२ डबलडेकर बसगाड्या वयोमर्यादा अनुसार बंद होणार आहेत. नवीन डबलडेकर बसगाड्या घेण्याबाबत अर्थसंकल्पात प्रस्तावित नाही.


‘तेजस्विनी’त पुरुष प्रवासी...
दररोज ‘बेस्ट’ने प्रवास करणाºया ३३ लाख प्रवाशांमध्ये सात लाख महिला प्रवासी आहेत. महिला प्रवाशांसाठी सहा ‘तेजस्विनी’ बसगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र योग्य नियोजन व जाहिरात न झाल्यामुळे या बसगाड्यांमध्ये पुरुष प्रवासीही काही वेळा दिसून आले आहेत.
पार्किंगला अल्प प्रतिसाद...
२४ बस आगार आणि ३६ बस स्थानकांचे द्वार खासगी वाहनांसाठी खुले करण्यात आले. त्यानुसार दररोज ३५०० बसगाड्या दिवसा तर ३२५ गाड्या रात्रीच्या उभ्या राहू शकतात. मुंबईत १४ हजार खासगी बसगाड्या आहेत. मात्र आॅगस्ट महिन्यात पार्किंगचे दर कमी करूनही १५ नोव्हेंबरपर्यंत केवळ दहा हजार ५६५ खासगी बस, चारचाकी, तीन व दोनचाकी गाड्यांनी पार्किंगचा लाभ घेतला.
बसथांब्यावर प्रवासी ताटकळत...
भाडेकपातीमुळे शेअर रिक्षा-टॅक्सीचे प्रवासी बेस्टकडे वळले. मात्र बसवाहक-चालकांची कमतरता, कमी बसगाड्यांमुळे दररोज अडीच हजार तासांचे नुकसान होत आहे. बस फेºया कमी होत असल्याने प्रवाशांची प्रतीक्षा आजही संपलेली नाही. विनावाहक बस सेवेला कामगारांचा विरोध असल्याने नवीन बसगाड्या प्रत्यक्षात ताफ्यात येण्यास अजून बराच काळ लागणार आहे.
अनुदानाचे केले काय?
आर्थिक मदतीची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. प्रवीण परदेशी यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच बेस्टला आर्थिक मदत जाहीर केली. बसगाड्यांची खरेदी, कामगारांचा बोनस, विविध बँकांमधील दोन हजार कोटींचे कर्ज फेडण्यासाठी महापालिकेने २१०० कोटी रुपये बेस्ट उपक्रमाला दिले आहेत. चारशे कोटींचे अनुदान गेल्या आठवड्यात महासभेने मंजूर केले. मात्र आगामी आर्थिक वर्षात २२४९ कोटींची तूट कायम आहे. त्यामुळे महापालिकेने दिलेल्या अनुदानाचे केले काय, याचा अहवाल सादर करण्याची मागणी विरोधी पक्षाने केली आहे.

Web Title: The best way to get out of trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.