बेस्ट खरेदी करणार ३०० विद्युत बसगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:17 AM2020-11-26T04:17:52+5:302020-11-26T04:17:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोरोना काळात वेगवान सेवा देणाऱ्या बेस्टकडे आता ३ हजार ८७५ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोरोना काळात वेगवान सेवा देणाऱ्या बेस्टकडे आता ३ हजार ८७५ बसगाड्यांचा ताफा आहे. यात १ हजार ९९ भाडे तत्त्वावरील बसगाड्या आहेत. याव्यतिरिक्त ३०० विद्युत बसगाड्या खरेदीचा आदेश देण्यात आला असून ६०० एकमजली सीएनजी बसेससाठी निविदा प्रक्रिया राबविली जात आहे.
बेस्ट समितीच्या बैठकीतील बेस्ट उपक्रमाच्या अर्थसंकल्पात नुकत्याच या बाबी नमूद करण्यात आल्या असून, बेस्टला तोटा सहन करावा लागणार असल्याने भाडेतत्त्वावरील बसगाड्या चालविताना योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. विशेषत: २०२२ साली भाडेतत्त्वावरील बसगाड्यांची संख्या ३ हजार असेल ही बाब विचारात घेता या बसगाड्या चालविण्याचे नियोजन काळजीपूर्वक करणे आवश्यक असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या सदस्यांच्या वारसांना ठरल्याप्रमाणे ५० लाख रुपये एवढी रक्कम दिली जात आहे. वारसांपैकी एका व्यक्तीला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विविध पदावर बेस्ट उपक्रमाच्या सेवेत सामावून घेण्याचे प्रयत्न प्रशासनामार्फत सुरू आहेत.
* ‘त्या’ मार्गांवर मिडी/मिनी गाड्या चालवाव्यात
वेट लिजवर बसगाड्या चालविण्याऐवजी उपक्रमाने आत्मनिर्भर होत स्वत:च्या बसगाड्या चालविण्यावर भर द्यावा. अधिकाधिक पॉइंट टू पॉइंट बस सेवा देण्यासाठी प्रयत्न करावेत. महसूल प्राप्तीसाठी बसथांब्यावर जाहिरात प्रदर्शित करावी, प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी प्रवाशांना देण्यात आलेल्या सवलतींमध्ये बदल करावा, बसगाड्यांची संख्या वाढविण्याबराेबरच तोट्यात चालणारे बस मार्ग फायद्यात आणण्याचा प्रयत्न करावा. गाड्या फ्लायओव्हरवरून नेण्याऐवजी नेहमीच्या मार्गाने चालवाव्यात, उत्पन्न मिळत असलेल्या मार्गांवर गाड्यांची संख्या वाढवावी. तोट्यातील मार्गांचा पुन्हा विचार करावा, जेथे प्रवासी संख्या जास्त आहे तेथे प्रायोगिक तत्त्वावर मिडी/मिनी गाड्या चालवाव्यात. इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग स्टेशन उभारावे. मेट्रो स्थानकांवर प्रवाशांना वातानुकूलित बस मिळेल, असे नियोजन करावे. पर्यटकांसाठी दुमजली आणि वातानुकूलित बसगाड्या सुरू कराव्यात, बसमार्ग बंद करताना नगरसेवकांना माहिती द्यावी. बेस्ट तोट्यात का, याबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशा सूचना बेस्ट समितीच्या बैठकीत देण्यात आल्या.