लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - बसचालकांबरोबरच आता वाहकही कंत्राटी पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव नुकताच बेस्ट समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. भाजप सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत खाजगीकरणाच्या या प्रस्तावाला विरोध केला. मात्र, काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन मिळाल्याने बेस्ट समितीने हा प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर केला.
बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात असल्याने भाडेतत्त्वावर बसगाड्या घेण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. मात्र, या खाजगी बसगाड्यांवर चालक आणि वाहक देखील खाजगी कंपनीचा असणार आहे. सीएनजीवर चालणाऱ्या अशा चारशे बसगाड्यांसाठी १९४२ कोटींमध्ये दहा वर्षांचे कंत्राट बेस्ट प्रशासनाने केले आहे. मात्र, हा निर्णय म्हणजे बेस्ट उपक्रमाचे खाजगीकरण असल्याचा आरोप भाजपचे बेस्ट सदस्य सुनील गणाचार्य यांनी बैठकीत केला.
खाजगीकरणाच्या प्रस्तावाला काँग्रेसचाही विरोध आहे; परंतु सध्या मुंबईला जादा बसगाड्यांची गरज आहे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बसगाड्या सुस्थितीत नाहीत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या प्रस्तावाचे समर्थन करण्याचा निर्णय घेतल्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले. अखेर बहुमताच्या जोरावर खाजगी वाहकांची सेवा घेण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सध्या भाडेतत्त्वावरील बसगाड्यांवर वाहक नेमण्यात येत नाहीत, तर बेस्ट उपक्रमाच्या सेवेतील वाहकांना ग्राउंड ड्युटी देण्यात आली आहे.
* * *
विद्युत विभागातही खासगी सेवा
बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागातच नव्हे तर विद्युत विभागातही खासगी सेवा घेण्यात येणार आहे. वीज बिघाड दुरुस्ती विभागाचे काम ठेकेदाराला देण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाने तयार केला होता.
बसची साफसफाईही ठेकेदाराकडून
* आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाने तीन हजारांहून अधिक बस भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात आठशे बस घेण्यात आल्या आहेत. यात चालक ठेकेदाराचा तर वाहक बेस्टचा असतो. त्यानंतर आता नव्या भाड्याच्या बस घेताना वाहकही ठेकेदाराकडून घेण्यात येणार आहे. परिवहन विभागातील रंगकाम, साफसफाई अशी कामेही ठेकेदाराकडून करून घेतली जात आहेत.
* दोन- तीन वर्षांत बसची संख्या सहा हजारांवर नेण्याचे बेस्टचे लक्ष्य आहे. बेस्टच्या ताफ्यात सध्या ३,६०० बसगाड्या असून यामध्ये भाडेतत्त्वावरील १,१०० बस आहेत. सहाशे नवीन बस भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव आहे.