बीकेसी कनेक्टरवरून ‘बेस्ट’ धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 11:52 PM2019-11-12T23:52:24+5:302019-11-12T23:52:28+5:30
पूर्व द्रुतगती मार्ग आणि वांद्रे-कुर्ला संकुलाला जोडणारा बीकेसी कनेक्टर हा उड्डाणपूल रविवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
मुंबई : पूर्व द्रुतगती मार्ग आणि वांद्रे-कुर्ला संकुलाला जोडणारा बीकेसी कनेक्टर हा उड्डाणपूल रविवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. शीव ते धारावी हे अंतर ३० मिनिटांनी कमी करणाऱ्या या पुलावरून बेस्ट बसगाड्यांची सेवा सुरू करण्याचा प्रशासनाचा विचार सुरू आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर एक बसमार्ग येथे सुरू होण्याची शक्यता आहे. या मार्गावरून सध्या फक्त
हलकी वाहने सोडण्यात येत आहेत. काही दिवसांनी येथून बेस्ट बस सुरू करता येईल का, याची चाचपणी बेस्ट प्रशासन करीत आहे. याबाबत वाहतूक अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली़
बेस्ट उपक्रमाकडे बसगाड्यांचा ताफा मर्यादित असल्याने नवीन बसमार्ग सुरू करणे शक्य नाही. एवरार्ड नगरहून सायन-धारावीमार्गे कलानगर, वांद्रेकडे जाणारे बसमार्ग या मार्गावरून वळवणे शक्य असल्याने या पर्यायांचा विचार करण्यात आला आहे. त्यानुसार ३५५ मर्या., ३५६ मर्या., ३७५ मर्या., ५०५ मर्या., ४७३ या बस नवीन मार्गावरून चालविणे शक्य होईल का, याचा अभ्यास करण्यात आला. मात्र या बसमार्गावरील बस अनेक वर्षांपासून चालविण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा रोष पत्करावा लागेल म्हणून तूर्तास या बसगाड्या नवीन मार्गावरून वळविणे शक्य होणार नाही. हा उन्नत मार्ग नवीन असल्याने सध्या फक्त सात बंगला यारी मार्ग ते तुर्भे या मार्गावरील ३५५ मर्या. ही बस या उन्नत मार्गावरून चालवण्याचा विचार सुरू आहे.
वेळेची मोठी बचत...
बीकेसीवरून वडाळ्याला जाण्यास यापूर्वी ४५ मिनिटांचा कालावधी लागत असे. बीकेसी कनेक्टरमुळे अवघ्या सहा मिनिटांमध्ये वडाळ्याला पोहोचता येत आहे.
>एमएमआरडीएची परवानगी आवश्यक
या मार्गावर बेस्ट बस सुरू करण्यासाठी बेस्ट उपक्रमाला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर ‘३५५ मर्यादित’ ही बस चालवण्यात येऊ शकेल. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद पाहूनच १ डिसेंबरपासून नियमित बससेवा या उन्नत मार्गावरून चालवण्यात येईल, असे बेस्टमधील सूत्रांनी सांगितले.