मुंबई/बीड - भाजपाने बीडमधून पंकजा मुंडेंना लोकसभेच्या मैदानात उतरवल्यानंतर महाविकास आघाडीनेही गतवर्षीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना तिकीट दिलं आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बजरंग सोनवणे यांच्या नावाची घोषणा झाली. त्यामुळे, ज्योती मेटे महाविकास आघाडीच्या स्पर्धेतून बाहेर पडल्या आहेत. मात्र, त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्याच्या हाललाचील सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. याच अनुषंगाने भाजपा नेत्या पंकजा मुंडेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, तो त्यांचा विषय आहे. त्यांचे अनुयायी आणि ज्योती मेटेच याबाबत निर्णय घेतील, असे पंकजा यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडेंसह अजित पवार यांच्यासोबत होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत तुतारी हाती घेतली. त्यानंतर, त्यांच्या उमेदवारीजी अधिकृत घोषणाही झाली. त्यामुळे, बीडमध्ये कमळ विरुद्ध तुतारी असा राजकीय सामना रंगणार आहे. मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या बजरंग सोनवणे यांनी गत लोकसभा निवडणुकीत प्रितम मुंडेंविरुद्ध निवडणूक लढवली होती. त्यामध्ये, प्रितम मुंडे यांना ६ लाख ७८ हजार १७५ मते तर बजरंग सोनवणे यांना ५ लाख ९ हजार १०८ मते मिळाली. तर, वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधव हे ९१ हजार ९७२ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. वंचितने अद्यापही या मतदारसंघात उमेदवार दिला नाही. आता, ज्योती मेटेंना महाविकास आघाडीची उमेदवारी न मिळाल्याने ज्योती मेटेंना वंचितकडून तिकीट देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारीसंदर्भात पंकजा मुंडेंना प्रश्न विचारला असता, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र, गेल्या ५ वर्षात किती लोकांशी संपर्क ठेवला, किती लोकांच्या कामासाठी ते आले, हेही महत्त्वाचे आहे, असा टोलाही पंकजा मुंडेंनी लगावला. तसेच, ज्योती मेटेंच्या उमेदवारीबाबतही पंकजा यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यांनी काय करावं हे त्यांनी व त्यांच्या अनुयायांनी ठरवलं पाहिजे. मात्र, मी लोकसभा निवडणूक लढवणारच, असं ज्योती मेटेंनी म्हटल्याचं मी न्यूज चनेलवर पाहिलं आहे. त्यामुळे, त्यांनी लढायची भूमिका ठेवली असेल तर ही सर्वस्वी त्यांनी भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी बीड लोकसभा आणि मेटेंबाबत दिली.
बीडमध्ये २०१९ साली असे झाले मतदान
दरम्यान, गत २०१९ च्या निवडणुकीत प्रीतम मुंडे यांना ६ लाख ७८ हजार १७५ मते तर बजरंग सोनवणे यांना ५ लाख ९ हजार १०८ मते मिळाली. तर, वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधव हे ९१ हजार ९७२ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या मतदारसंघात ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.