Join us

बेस्ट कामगार कोविड भत्त्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी असणारी रेल्वे सेवा संपूर्ण बंद असताना डॉक्टर, पोलीस, नर्स, सफाई कामगार आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी असणारी रेल्वे सेवा संपूर्ण बंद असताना डॉक्टर, पोलीस, नर्स, सफाई कामगार आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचविण्याचे अत्यंत जोखमीचे आणि महत्त्वाचे काम मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन विभाग म्हणजेच बेस्ट कामगारांनी केले, अजूनही करीत आहेत. मात्र तेच अद्याप कोविड भत्त्यापासून वंचित आहेत.

कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना केंद्र शासन, महाराष्ट्र शासनाकडून कोविड भत्ता देण्यात येत आहे. आजमितीस इतर सर्व कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता मिळत आहे. मात्र बेस्ट कामगारांना फक्त मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचा कोविड भत्ता देण्यात आला. त्यानंतर ताे देण्यात आलेला नाही. याबाबत बेस्ट प्रशासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे बेस्ट कामगारांमध्ये संभ्रम आहे.

चौकशी केल्यावर बेस्ट प्रशासन थकीत कोविड भत्ता देण्याचे फक्त आश्वासन देत आहे. कृती करीत नाही, असे स्वाभिमानी भारतीय पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुश कुराडे यांनी सांगितले. डिसेंबर महिन्याअखेर बेस्ट कामगारांना थकीत कोविड भत्ता दिला नाही, तर बेस्ट प्रशासन मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

...................................