Join us

‘बेस्ट’ समितीच्या अध्यक्षपदावर ‘बेस्ट’ कामगार

By admin | Published: March 15, 2017 4:29 AM

स्थायी समितीपाठोपाठ महत्त्वाच्या असलेल्या सुधार समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून अनंत उर्फ बाळा नर व बेस्ट समितीसाठी अनिल कोकीळ यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला आहे

मुंबई : स्थायी समितीपाठोपाठ महत्त्वाच्या असलेल्या सुधार समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून अनंत उर्फ बाळा नर व बेस्ट समितीसाठी अनिल कोकीळ यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला आहे. विशेष म्हणजे बेस्टचे कर्मचारी असलेले कोकीळ यांची अध्यक्षपदावर वर्णी लागली आहे. शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात एकही अर्ज न आल्याने ही निवड बिनविरोध होणार आहे. याची घोषणा १६ मार्चला होणाऱ्या समिती सभेत केली जाणार आहे.सुधार व बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची मंगळवारी अंतिम मुदत होती. या समितीमध्ये शिवसेनेने अनेक दिग्गजांना सदस्यत्व दिले आहे. त्यामुळे तीन माजी महापौरांपैकीच एकाची वर्णी असेल अशी चर्चा होती. मात्र शिवसेनेकडून अनंत नर यांना सुधार समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळाली. अनंत नर यांची महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येण्याची ही दुसरी वेळ आहे. पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७७ मधून ते १२ हजार ८५४ मतांनी निवडून आले. यापूर्वी त्यांनी स्थापत्य समितीच्या (उपनगर) अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. ते स्थायी समितीवर सदस्यही होते.बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी अनिल कोकिळ यांनी अर्ज भरला. अनिल कोकीळ हे पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २०४ मधून प्रथमच १३ हजार ४१० मतांनी निवडून आले आहेत. त्यांनी बेस्टमध्ये ३६ वर्ष नोकरी केली आहे. त्यांचे वडीलही या सेवेत होते. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी महापालिकेची निवडणूक लढवली व ते निवडूनही आले. आर्थिक परिस्थिती ढासळलेल्या बेस्टला सावरण्यासाठी ते काय प्रयत्न करतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.