मुंबई : बेस्ट उपक्रमातील रोजंदारी कर्मचाºयांना कायम करून, बेस्टच्या सर्व कामगारांना बोनस देण्याच्या मागणीसाठी बॉम्बे इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनने मंगळवारी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाला घेराव घातला. या वेळी महापौरांसह बेस्ट समितीचे अध्यक्ष आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेते यांनी युनियनच्या मागणीवर एकमत दर्शवित, प्रशासनाकडे मागणी लावून धरण्याचे आश्वासित केले. तरी रोजंदारी कामगारांनी ३ आॅक्टोबरपासून पुकारलेले कामबंद आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची माहिती, युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी दिली.गायकवाड यांनी सांगितले की, रोजंदारी कामगारांना बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागात कायम सेवेवर घेण्याबाबत बेस्ट समिती अध्यक्षांनी सहमती दर्शविली. याबाबत प्रशासनाला सूचना करण्याचेही त्यांनी मान्य केले. रोजंदारी कामगारांना बेस्ट उपक्रमात घेतल्याने, प्रशासनावर कोणत्याही प्रकारचा आर्थिक ताण येणार नसल्याचे युनियनने त्यांना स्पष्ट करून दाखविले. परिणामी, या मागणीसाठी बुधवारी दादर येथे जाहीर सभा घेणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. शिवाय कायम सेवेत घेतले जात नाही, तोपर्यंत रोजंदारी कामगार काम सुरू करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.महापालिका कामगारांप्रमाणे बेस्ट कामगारांना बोनस मिळावा, म्हणून युनियनच्या नेतृत्वाखाली शेकडो कामगार मंगळवारी महापालिका मुख्यालयावर धडकले. या मागणीवर महापौरांसह बेस्ट समिती अध्यक्ष आणि सभागृह नेत्यासह विरोधी पक्षनेतेही एकमत झाल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे कामगारांच्या मागण्या योग्य असल्याचे मुद्दे सर्व नेत्यांना सांगितले आहेत. त्यामुळे बुधवारी सभागृहात नेमके काय घडते, हे पाहून पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे युनियनने सांगितले.
बोनससाठी बेस्ट कामगारांचा घेराव! रोजंदारी कामगारांचे आंदोलन सुरूच : कायम सेवेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 3:36 AM