Join us

बोनससाठी बेस्ट कामगार काढणार मेणबत्ती मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 3:02 PM

बेस्ट उपक्रमातील स्थायी, कॅज्युअल लेबर आणि अधिकाऱ्यांना बोनस मिळावा म्हणून मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन व बेस्ट कामगार क्रांती संघ या संघटनांनी मेणबत्ती मोर्चाची हाक दिली आहे.

मुंबई - बेस्ट उपक्रमातील स्थायी, कॅज्युअल लेबर आणि अधिकाऱ्यांना बोनस मिळावा म्हणून मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन व बेस्ट कामगार क्रांती संघ या संघटनांनी मेणबत्ती मोर्चाची हाक दिली आहे. दिवाळीपूर्वी  २० टक्के दराने बोनस दिला नाही, तर ऑगस्ट क्रांति मैदान ते आझाद मैदानापर्यंत २४ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता मेणबत्ती मोर्चा काढण्याचा इशारा संघटनेचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी दिला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते.

एक महिन्यापूर्वी बेस्ट प्रशासनासह बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक, बेस्ट समितीचे चेअरमन यांकडे बोनसच्या मागणीचे निवेदन दिल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. ते म्हणाले की, या निवेदनात २०१७-१८ सालासाठी २० टक्के दराने बोनस (सानुग्रह-अनुदान) रक्कम दिपावलीपूर्वी देण्याची मागणी केली होती. मात्र मागणीवर कोणताही खुलासा प्रशासनाने केलेला नाही. बेस्ट उपक्रमाला होणाऱ्या फायद्याच्या 40 टक्के रक्कम मुंबई महानगरपालिकेला देणे बेस्ट उपक्रमाला कायदेशीर बंधनकारक आहे.

तसेच बेस्ट उपक्रमाला तोटा झाल्यास मुंबई महापालिकेला बेस्ट उपक्रमाला अर्थसाह्य करण्याचा नियम व कायदा आहे. असे असूनही बेस्ट प्रशासन व मनपा आयुक्त यांनी कायदा व नियमांचा भंग करून गेल्यावर्षी दिलेली बोनसची रक्कम समान १० हप्त्यांमध्ये बेस्ट कामगारांच्या वेतनातून कपात केली. हा बेस्ट कामगारांवर अन्याय आहे. त्याविरोधात संघटनेने औद्योगिक न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. 

उद्योग धंदे तोट्यात चालत असतील तरीही कामगारांना किमान बोनस रक्कम देण्याचा कायदा अस्तित्वात आहे. वर्षाच्या बारा महिने कार्यक्षमतेने काम करणाऱ्या कामगारांना तेरावे वेतन देण्याची प्रथा व कायदेशीर बंधन प्रत्येक उद्योगावर आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमातील कामगारांना बोनस देणे बंधनकारक असल्याचा दावा करत युनियनने मेणबत्ती मोर्चाची हाक दिली आहे.

टॅग्स :आंदोलनबेस्ट