मुंबई - गेल्या 8 दिवसांपासून संपावर असलेल्या बेस्ट कामगारांनी आज प्रशासनाविरुद्धची लढाई जिंकली. हायकोर्टाच्या आदेशानंतर कामगार नेते शशांक राव यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली. राव यांच्या या घोषणेनंतर कामगारांनी एकच जल्लोष केला. तब्बल 8 दिवस लढाई दिल्यानंतर कामगारांचा हा विजय अनेक कामगारांच्या डोळ्यात हसू अन आसू घेऊन आला.
वडाळा येथील बस आगरशेजारील कामगार वसाहतीमध्ये कामगारांचा मेळावा पार पडला. कामगार कृती समितीचे नेते शशांक राव यांचे, कोण आला रे कोण आला, बेस्टचा वाघ आला असे जोरदार स्वागत राव यांचे करण्यात आले. त्यावेळी, या संपात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार राव यांनी मानले. तसेच मुंबईकर जनतेलाही सलाम केला. कामगारांचा लढा यशवी झाला आहे. काही लोकांना मिरची लागली होती, लिहून घेतल का विचारत होते, पण हे आता कोर्टानेच लिहून दिल. बेस्टमध्ये 1500 गाड्या आणि खासगी कर्मचारी घेण्याचा डाव होता, हे सर्व मृत्यूपत्र होत, असे म्हणत शशांक राव यांनी शिवसेनेच्या संघटनेला चपराक लगावली.
आपल्याला संपविण्याचा दावा करीत होते, महापौर बंगल्यावर झालेल्या बैठकीत आपल्याला काही मिळत नव्हते. मागील सर्व विसरा अस सांगण्यात आलं होतं. हे आपण मान्य केले नाही. बेस्टला किती मदत करायची अस म्हणत होते. उद्धव ठाकरे म्हणत होते पैसे नाहीत , पैसे कुठून आणायचे. पण, हे आपण होऊ दिल नाही, कामगारांसोबत ही सर्व चळवळ उभी झाली आहे. आता, बेस्ट ठरवेल तुम्हाला किती मदत करायची ते संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही असे आश्वासन देत संप मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली.
वडाळा येथील बेस्ट डेपोत राव यांनी सभा घेऊन प्रशासनासोबत झालेल्या वाटाघाटीची माहिती दिली. अखेर कामगारांपुढे बेस्ट प्रशासन नमले असून कामगारांचा विजय झाल्याची माहिती राव यांनी दिली. कामगार एकजुटीचा विजय झाला आहे. कामगारांच्या पगारात किमान 7 हजारांची वाढ होईल. तसेच संपावरील एकाही कामगार-कर्मचाऱ्यावर कुठलिही कारवाई करण्यात येणार नसल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आल्याचे राव यांनी सांगितले. राव यांच्या सभेनंतर वडाळा डेपोत कामगारांचा जल्लोष पाहायला मिळाला. कामगरांनी अक्षरश: नाचून आनंद व्यक्त केला. एकमेकांना जादू की झप्पी देत, कामगार नेत्यांना खांद्यावर घेत कामगारांचा जल्लोष पाहायला मिळाला. कामगारांना आनंद त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. राव यांच्या घोषणेनंतर उपस्थिता कामगारांपैकी अनेकांच्या डोळ्यात हासू अन् आसू पाहायला मिळाले. गेल्या 8 दिवसांपासून आपल्या बसपासून दूर असलेल्या कामगारांनी आज पुन्हा एकदा बसला जवळ केला. राव यांच्या घोषणेनंतर काही वेळातच पहिली बस डेपोतून बाहेर पडली. कामगार नेते शरद राव यांचे पुत्र शशांक राव यांनी करून दाखवलं, अशी प्रतिक्रिया अनेक कामगार आणि सोशल मीडियातून व्यक्त होत आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी न्यायालयानं मध्यस्थाची नियुक्ती केली आहे. न्यायालयानं अंतिम तडजोडीसाठी प्रशासनाला 3 महिन्यांची मुदत दिली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून लागू होणारी 10 टप्प्यांची वेतनवाढ तातडीनं लागू करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असं आश्वासन बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. यासोबतच एकाही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करणार नाही, कोणाचंही वेतन कापलं जाणार नाही, अशी आश्वासनेही प्रशासनाकडून देण्यात आली आहेत.