Join us  

बेस्ट कामगार बेमुदत उपोषणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:52 AM

आर्थिक मदतीसाठी महापालिका आणि बेस्ट प्रशासनामध्ये चर्चा होत असली तरी त्यावर तोडगा निघालेला नाही. यामुळे हवालदिल झालेले बेस्ट कामगार आजपासून वडाळा आगाराबाहेर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

मुंबई : आर्थिक मदतीसाठी महापालिका आणि बेस्ट प्रशासनामध्ये चर्चा होत असली तरी त्यावर तोडगा निघालेला नाही. यामुळे हवालदिल झालेले बेस्ट कामगार आजपासून वडाळा आगाराबाहेर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. बेस्ट वर्कर्स युनियनचे शशांक राव यांच्यासह कृती समितीमधील १२ संघटनांचे पदाधिकारी या उपोषणात सहभागी झाले आहेत. पालिका आयुक्तच आर्थिक मदत देण्याच्या मन:स्थितीत नसल्याने हे आंदोलन त्यांच्याविरुद्ध असल्याचे या नेत्यांनी जाहीर केले आहे.पालिका आयुक्तांच्या अटींनुसार बेस्ट प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यात स्वेच्छानिवृत्ती, भत्त्यांमध्ये कपात सुचवण्यात आली आहे. तसेच बेस्टच्या तिकिटांच्या दरामध्ये बदल, बेस्टच्या मार्गांमध्ये बदल, जास्त प्रवासी असलेल्या ठिकाणी जास्त बस गाड्या तर कमी प्रवासी असलेल्या ठिकाणी कमी बस गाड्या चालवणे, बेस्टमध्ये भरती बंद या सूचनांमुळे वादग्रस्त ठरलेला हा आराखडा लांबणीवर पडला आहे. कामगारांचा दर महिन्याचा पगार देणेही बेस्टसाठी अवघड झाले आहे. यावर मार्ग काढण्याचे महापौरांचे प्रयत्नही फेल गेले आहेत. त्यामुळे बेस्ट कामगार नेत्यांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणामुळे बेस्ट बंद होऊन मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी कर्मचारी साखळी उपोषण करत आहेत. पालिका आयुक्त अजय मेहता यांनी या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यास १० आॅगस्टला होणाºया पुढील बैठकीपर्यंत उपोषण सुरूच राहील. त्यामुळे या उपोषणाची जबाबदारी पालिका आयुक्तांवर असेल, असे बेस्ट कामगार सेनेचे पदाधिकारी सुहास सामंत यांनी सांगितले.