Join us

बेस्ट कामगारांचा संप २० ऑगस्टपर्यंत स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 4:35 AM

चर्चेसाठी प्रशासनाने दिल्या पाच तारखा; मागण्यांबाबत प्रशासन सकारात्मक असल्याने घेतली माघार

मुंबई : बेस्ट उपक्रमातील कामगारांच्या सुधारित वेतनश्रेणीबाबत सुरू असलेल्या वाटाघाटीची दुसरी बैठक मंगळवारी यशस्वी ठरली. बेस्ट प्रशासन कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याने मंगळवारी मध्यरात्रीपासून होणारा बेस्ट कामगारांचा संप पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील बैठकांमध्ये मागण्या मान्य न झाल्यास २० ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संप पुकारण्याचा इशारा कामगारनेते शशांक राव यांनी दिला आहे.बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये जून महिन्यात सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या. मात्र त्यानंतर एक महिना उलटलातरी प्रशासन चर्चेला बोलावित नसल्याने बेस्ट वर्कर्स युनियन या मान्यताप्राप्त संघटनेचे नेते शशांक राव यांनी ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली होती. मात्र प्रशासन वाटाघाटी करण्यास तयार असल्याने संप करू नये, असे आवाहन बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र्र बागडे यांनी केले होते.संपावर ठाम असल्याने ७ ऑगस्ट रोजी साजऱ्या होत असलेल्या ७३ व्या ‘बेस्ट दिना’वर संपाचे सावट होते. मात्र हा संप टाळण्यासाठी प्रशासनाने कामगार संघटनांना चर्चेसाठी मंगळवारी दुपारी बेस्ट भवनात बोलाविले होते. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यामुळे नियोजित संप पुढे ढकलण्यात येत असल्याचे शशांक राव यांनी परळ येथील शिरोडकर शाळेत आयोजित कामगार मेळाव्यात जाहीर केले. त्यामुळे संपाचे संकट तूर्तास टळले आहे....यामुळे दिली संपाची हाकसुधारित वेतनश्रेणी, कामगार वसाहतींची दुरुस्ती आदी मागण्यांबाबत बेस्ट कामगार संघटनांनी जानेवारी महिन्यात संप पुकारला होता. हा संप नऊ दिवस चालल्यानंतर उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या मध्यस्थीच्या माध्यमातून बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या. मात्र सामंजस्य करार झाल्यानंतर बेस्ट प्रशासनाने चर्चेसाठी बोलावलेच नाही, असा आरोप कामगार संघटनांकडून होत आहे....अन्यथा २० ऑगस्टपासून संपबेस्ट कामगारांचा संप तूर्तास टळला आहे. मात्र ९ ते १९ ऑगस्टदरम्यान, बेस्ट प्रशासनाने कामगार संघटनांना चर्चेसाठी बोलावले आहे. यासाठी पाच तारखा दिल्या आहेत. या कालावधीत निर्णय न झाल्यास २० ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संप पुकारण्यात येईल, असा इशारा राव यांनी दिला आहे.

टॅग्स :बेस्टसंप