Join us  

बेस्टचे कामगार उपसणार संपाचे हत्यार, ६ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 2:39 AM

मुंबई महापालिका प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्याने अखेर बेस्टच्या कामगार संघटनेने तिस-या दिवशी उपोषण मागे घेतले आहे. आर्थिक मदत मिळवण्यासाठी बेस्टच्या कमगारांनी आता संपाचे हत्यार उपसले आहे.

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्याने अखेर बेस्टच्या कामगार संघटनेने तिस-या दिवशी उपोषण मागे घेतले आहे. आर्थिक मदत मिळवण्यासाठी बेस्टच्या कमगारांनी आता संपाचे हत्यार उपसले आहे. त्यानुसार ६ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचे ४४ हजार कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत. बेस्टच्या इतिहासात पहिल्यांदाच वर्धापन दिनी बेस्ट बंद असणार आहे. ७ आॅगस्टला रक्षाबंधन असल्याने मुंबईकरांची मात्र गैरसोय होणार आहे.बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने महापालिकेने मदत करून पालकत्वाची भूमिका पार पाडावी, अशी कामगारांची मागणी आहे. मात्र याबाबत पालिका प्रशासनाबरोबरच्या पाच बैठका निष्फळ ठरल्याने अखेर बेस्ट कामगारांनी मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. वडाळा आगारात बेस्ट कामगार संघटनांचे नेते बेमुदत उपोषणाला बसले होते; तर कामगारांचेही साखळी उपोषण सुरू होते. मात्र गेल्या तीन दिवसांत पालिकेचा एकही वरिष्ठ अधिकारी तिथे फिरकला नाही. त्यामुळे कामगार हवालदिल झाले आहेत.अखेर तिसºया दिवशी उपोषण मागे घेत असल्याचे बेस्ट कामगार संघटनांच्या कृती समितीने जाहीर केले. लोकशाही मार्गाने मदत मिळत नसल्याने आपल्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी संपावर जाण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. विशेष म्हणजे बेस्ट उपक्रम ७० वा वर्धापन दिन साजरा करत असताना त्याच दिवशी बेस्ट बसगाड्या बंद असणार आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.संपात सहभागी संघटनाबेस्ट कामगार सेना, बेस्ट वर्कर्स युनियन, बेस्ट कामगार संघटना, भाजपा बेस्ट कामगार संघ, बेस्ट कामगार युनियन, बेस्ट एम्प्लॉइज युनियन, बेस्ट परिवहन कर्मचारी संघ, बेस्ट जागृत कामगार संघटनांसह अनेक संघटना संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे बस सेवा पूर्णत: ठप्प असतील, असा दावा बेस्ट कामगार संघटना करत आहेत.अशा आहेत मागण्याआर्थिक मदत मिळावी, कर्जाचे व्याज दर कमी असावे, बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, पालिका आकारत असलेल्या विविध करांतून सूट मिळावी, बेस्ट कामगारांचा पगार महिन्याच्या दुसºया दिवशी करावा अशा मागण्या कामगारांनी केल्या आहेत.