Join us

बेस्ट कामगारांचा संप सुरू ठेवूनच चर्चेला येणार; शशांक राव यांची मेळाव्यामध्ये घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 8:03 PM

आधी संप मागे घ्या, मग तोडगा काढू असा दबाव महापालिकेकडून कृती समितीवर टाकण्यात येत होता.

मुंबई : मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर चौथ्या दिवशीही तोडगा निघू शकलेला नाही. बेस्ट कामगारांच्या संपाचा फटका हजारो मुंबईकरांना चार दिवसांपासून सहन करावा लागत आहे. प्रशासन दडपशाही करून संप मागे घेण्यास सांगत आहे मात्र, बेस्ट कामगारांचा संप सुरू ठेवूनच चर्चेला येणार असल्याचा ठाम निर्धार कृती समितीचे शशांक राव यांनी कामगारांच्या मेळाव्यामध्ये सांगितले. 

आधी संप मागे घ्या, मग तोडगा काढू असा दबाव महापालिकेकडून कृती समितीवर टाकण्यात येत होता. उद्या राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीची बैठक होणार आहे. यामुळे संप मिटल्याची घोषणा करण्यासाठी सरकार- पालिकेचा तगादा लावला होता. संपावर तोडगा काढण्यासाठी दुपारी 4 वाजता मुख्य सचिव, वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि नगर विकास खात्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. मात्र, यावेळीही तोडगा निघू शकला नाही. 

गुरुवारी रात्री 10 वाजेपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासोबत कृती समितीची तब्बल 7 तास चर्चा झाली. मात्र, यामध्ये तोडगा काढण्यात अपयश आल्याने चौथ्या दिवशीही संप सुरुच होता. आज झालेल्या कामगारांच्या मेळाव्यामध्ये शशांक राव यांनी भुमिका स्पष्ट करताना संप सुरुच राहणार असल्याचे सांगितले. तसेच संप सुरु ठेवूनच चर्चेला येणार असल्याचेही त्यांनी बेस्ट प्रशासन आणि पालिकेला सुनावले. 

टॅग्स :बेस्टसंप