Join us

कामगार जिंकला ! कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची 'BEST' वाढ होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 3:41 PM

कामगारांना संपवण्याचाचा डाव होता पण आम्ही लढलो. बेस्ट कामगारांच्या एकजुटीचा हा विजय आहे.

मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांनी आठ दिवसांनंतर संप मागे घेतला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्थाची नेमणूक केली आहे. त्यानंतर बेस्ट कामगारांचे नेते शशांक राव यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली. तसेच प्रशासनाने मागण्या मान्य केल्या असून कामगारांच्या पगारात किमान 7 हजार रुपयांची वाढ होईल, असेही राव यांनी यावेळी सांगितले. कामगार जिंकला, कामगार एकजुटीचा विजय असो, या घोषणांनी वडाळा बस डेपोचा परिसर दणाणून गेला होता. तर, कामगारांच्या चेहऱ्यावर 8 दिवसांनी आनंद दिसत होता. 

कामगारांना संपवण्याचाचा डाव होता पण आम्ही लढलो. बेस्ट कामगारांच्या एकजुटीचा हा विजय आहे. गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्याचा लढा यशस्वी झाला आहे. बेस्टकडे पैस नसल्याचं उद्धव ठाकरेंनी आम्हाला म्हटलं. पण, आम्ही न्यायालयातून लढाई लढली आणि जिंकली, असेही राव यांनी म्हटले. कोर्टाच्या निर्णयानंतर वडाळा बस डेपोत कामगार नेते शशांक राव यांनी सभा घेतली. विशेष म्हणजे, कामगार नेते दत्ता सामंत यांच्या पुण्यतिथीदिनी कामगारांना न्याय मिळाला, आमचा विजय झाला असे राव यांनी म्हटले. दरम्यान, यावेळी कामगारांना नाचून जल्लोष साजरा केला.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी न्यायालयानं मध्यस्थाची नियुक्ती केली आहे. न्यायालयानं अंतिम तडजोडीसाठी प्रशासनाला 3 महिन्यांची मुदत दिली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून लागू होणारी 10 टप्प्यांची वेतनवाढ तातडीनं लागू करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असं आश्वासन बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. यासोबतच एकाही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करणार नाही, कोणाचंही वेतन कापलं जाणार नाही, अशी आश्वासनेही प्रशासनाकडून देण्यात आली आहेत. 

टॅग्स :बेस्टउद्धव ठाकरेउच्च न्यायालय