Join us

मुंबईत गणेश दर्शनासाठी 'बेस्ट'ची वातानुकूलित 'हो हो' बस सेवा

By सचिन लुंगसे | Published: September 03, 2022 6:12 PM

सदर बस सेवा ३ सप्टेंबर २०२२ ते ८ सप्टेंबर २०२२ या कालावधीत रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत दर २५ मिनिटांच्या अंतराने प्रवर्तित करण्यात येणार आहे

मुंबई : गणेशोत्सवादरम्यान गणेश भक्तांना सार्वजनिक गणपतीचे दर्शन सुलभ रीतीने करता यावे, याकरिता बेस्ट उपक्रमाने रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत खुल्या दुमजली बस गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु गणेश भक्तांचा वाढता उत्साह आणि खुल्या दुमजली बस गाड्यांना मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून बेस्ट उपक्रमाने आता वातानुकूलित हो-हो बस सेवा गणेश भक्तांच्या सेवेकरीता दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. 

सदर बस सेवा ३ सप्टेंबर २०२२ ते ८ सप्टेंबर २०२२ या कालावधीत रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत दर २५ मिनिटांच्या अंतराने प्रवर्तित करण्यात येणार आहे. या बसगाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून प्रवर्तित होणार असून मेट्रो, गिरगाव चर्च, प्रार्थना समाज, ताडदेव, नागपाडा भायखळा रेल्वे स्थानक पूर्व, जिजामाता उद्यान, लालबाग, हिंदमाता, दादर रेल्वे स्थानक पूर्व, दादर टीटी या ठिकाणाहून वडाळा बस आगारापर्यंत चालवल्या जाणार आहेत. 

सदर बस सेवेकरिता केवळ ६० रुपये इतक्या दराचा बसपास उपलब्ध होणार असून यामध्ये साधी, मर्यादित तसेच वातानुकूलित बसगाडीतून प्रवासाकरिता सदर पास वैध राहणार आहे. परंतु, खुल्या दुमजली बस गाडीसाठी वैध नसेल. सदर बससेवा गणेश भक्तांना एका ठिकाणी उतरून गणेश दर्शनानंतर पुन्हा पुढील ठिकाणी गणेश दर्शनासाठी जाण्याकरिता उपलब्ध असणार आहे. 

अधिक माहिती करता प्रवाशांनी कृपया १८००२२७५५० या टोल फ्री क्रमांकावर किंवा ०२२२४१९०११७ या क्रमांकावर संपर्क साधावा. सर्व गणेश भक्तांनी या होहोबसेवेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमांकडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :मुंबईबेस्टगणेशोत्सवगणेशोत्सव