Join us

बेस्टच्या सीएनजी बसगाड्यांची रात्रीच्या वेळेतही तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:22 AM

काही दिवसांपूर्वी गोरेगाव पूर्व येथे लागलेल्या सीएनजी बसच्या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली.

मुंबई : सीएनजी बसगाडीला आग लागण्याच्या घटनेनंतर बेस्ट उपक्रमाने कानाला खडा लावला आहे. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनाने खबरदारी म्हणून नियमित तपासणीबरोबरच दर शनिवार व रविवारी रात्रीच्या वेळेत सर्व सीएनजी बसची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी गोरेगाव पूर्व येथे लागलेल्या सीएनजी बसच्या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. या बसमधील तीन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. गाडीच्या चालकाला उतरताना डाव्या पायाला दुखापत झाली. अशा वेळी या बस गाडीमध्ये जास्त प्रवासी असते तर मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याची शक्यता होती. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. या घटनेच्या चौकशीत बस आगारातून बाहेर काढताना बसच्या टाकीत पूर्ण गॅस होता. कोणतीही गळती होत नव्हती.ही बस दिंडोशी आगार येथून गोरेगाव स्थानक पूर्व येथून पुन्हा नागरी निवारा परिषदेकडे जात असताना बसखालून आवाज आला व काही मिनिटांमध्येच बसने पेट घेतला.सर्व सीएनजी बसची तपासणी करणारसीएनजी बसगाड्यांची बेस्टतर्फे नियमित तपासणी करण्यात येते. या बसमध्ये कोणतीही तक्रार नव्हती, असे आढळून आले. अशा पद्धतीने सीएनजी बसला प्रेशर गॅसचा स्फोट होऊन पहिल्यांदा आग लागली आहे.अशा घटना टाळण्यासाठी यापुढे सर्व १८८५ सीएनजी बसचे प्रेशर गॅस बदलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शनिवार व रविवार रात्री सर्व सीएनजी बसची तपासणी बेस्टतर्फे केली जाणार आहे.

टॅग्स :बेस्ट