बेस्टच्या ताफ्यात वाढ होतेय; ५ नव्या एसी इलेक्ट्रॉनिक डबलडेकर येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 12:09 PM2023-11-25T12:09:00+5:302023-11-25T12:09:15+5:30
५ नव्या एसी इलेक्ट्रॉनिक डबलडेकर, तर १० एसी बसचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बसेसच्या ताफ्यात सातत्याने घट होत असताना, ५ नव्या एसी इलेक्ट्रॉनिक डबलडेकर आणि १० एकमजली एसी इलेक्ट्रॉनिक बसेसचा समावेश उपक्रमाकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, बेस्ट उपक्रमाने बसगाड्यांची संख्या प्रवाशांच्या गरजेनुसार वाढविण्याचा निर्णय या आधीच घेतला असून, त्याप्रमाणे विविध बसपुरवठादार व्यवसाय संस्थांना बसपुरवठा करण्याकरिता कार्यादेश देण्यात आल्याचे उपक्रमाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे लवकरच या नवीन बसगाड्यांचा पुरवठा प्राप्त होणार आहेत.
मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी व्हावा, म्हणून २० वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बसगाड्या बसमार्ग क्र. ए-१३८ व ए-११५ या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एन.सी.पी.ए. या दरम्यान आता नव्याने सुरू करण्यात येत आहेत.
या एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बससेवेला प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद प्राप्त होत असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.
१० इलेक्ट्रॉनिक बस
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये १० नवीन एकमजली (सिंगल डेकर) एसी इलेक्ट्रिक बसगाड्या उपक्रमाच्या मुंबई सेंट्रल आगारातून सुरू करण्यात येत आहेत. या बसगाड्या ए-३५१ बसमार्गावर, मुंबई सेंट्रल आगार ते टाटा वीजसंग्राही केंद्र (माहुल) या दरम्यान सुरू करण्यात येत आहेत.
बेस्ट उपक्रमाने ‘ऑलेक्ट्रा’ या संस्थेला एकूण २,१०० बसगाड्या पुरवठा करण्याचे कार्यादेश दिलेला असून, या अंतर्गत या संस्थेने एकूण ३० बसगाड्यांचा पुरवठा केला. लवकरच उर्वरित बसगड्यांचाही पुरवठा करण्यात येणार आहे.