बेस्टचा प्रवास सुखाचा... १६ एसी डबल डेकर दाखल; पुढील वर्षापर्यंत येणार ९०० बस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 12:26 PM2023-09-15T12:26:00+5:302023-09-15T12:27:10+5:30
Mumbai: मुंबईची शान असलेली डबल डेकर बंद होणार नसून, उलट जुलै २०२४ पर्यंत मुंबईकरांच्या सेवेसाठी तब्बल ९०० वातानुकूलित डबल डेकर दाखल होणार आहेत. सध्या ३५ डबल डेकर असून त्यापैकी गुरुवारपासून १६ डबल डेकर रस्त्यावर धावू लागल्या.
मुंबई - मुंबईची शान असलेली डबल डेकर बंद होणार नसून, उलट जुलै २०२४ पर्यंत मुंबईकरांच्या सेवेसाठी तब्बल ९०० वातानुकूलित डबल डेकर दाखल होणार आहेत. सध्या ३५ डबल डेकर असून त्यापैकी गुरुवारपासून १६ डबल डेकर रस्त्यावर धावू लागल्या.
या बसगाड्या पर्यावरणपूरक असून त्यातून कोणत्याही प्रकारचे ध्वनी किंवा वायू प्रदूषण होत नाही. या गाड्यांमध्ये दोन्ही बाजूंनी स्वयंचलित प्रवेशद्वार असल्याने प्रवाशांना सुविधा उपलब्ध होईल. या गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मोबाइल चार्जिंगची व्यवस्थाही आहे. बसभाडे नाममात्र असेल, असे बेस्टकडून सांगण्यात आले. स्वीच मोबिलिटी या संस्थेला २०० बसगाड्या पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यापैकी ३५ गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. उर्वरित बस मार्च २०२४ पर्यंत प्राप्त होतील. त्याचप्रमाणे हरित मोबिलिटी या संस्थेला ७०० एसी डबल डेकर पुरवण्यासाठी कार्यादेश दिला आहे.
डिसेंबरपर्यंत ५० बस
स्वीच मोबिलिटी या संस्थेकडून डिसेंबर २०२३ मध्ये ५० बस आणि जानेवारी २०२४ पासून जून २०२४ पर्यंत प्रत्येक महिन्यात १०० बस, तसेच जुलै २०२४ मध्ये ५० बस प्राप्त होतील. ही बस सेवा मुंबईतील विविध १२ बस आगारांमधून चालवण्यात येतील.
... म्हणून नव्या इलेक्ट्रिक गाड्या
डबल डेकरमधून मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी बेस्ट उपक्रमाने २१ फेब्रुवारी २०२३ पासून वातानुकूलित डबल डेकर सुरू केल्या. विद्यमान डबल डेकर बसगाड्यांचे आयुर्मान संपल्यामुळे या बसगाड्यांच्या जागेवर नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या चालवल्या जात आहेत, असेही उपक्रमाने सष्ट केले आहे.