बेस्टची ‘जम्बो’ कमाई, मेगाब्लॉक काळात मिळाले ५५ लाख प्रवासी, ५ कोटींचा गल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 09:19 AM2024-06-03T09:19:27+5:302024-06-03T09:19:38+5:30

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे या दोन ठिकाणी फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे घेण्यात आलेल्या जम्बो ब्लॉकचा परिणाम लोकल वाहतुकीवर झाला.

BEST's 'jumbo' revenue during the megablock period was 55 lakh passengers, 5 crores | बेस्टची ‘जम्बो’ कमाई, मेगाब्लॉक काळात मिळाले ५५ लाख प्रवासी, ५ कोटींचा गल्ला

बेस्टची ‘जम्बो’ कमाई, मेगाब्लॉक काळात मिळाले ५५ लाख प्रवासी, ५ कोटींचा गल्ला

मुंबई : मध्य रेल्वेवरील जम्बो ब्लॉकचा फायदा बेस्टला झाला. ३१ मे आणि १ जून या दोन दिवसांत बेस्टमधून जवळपास ५५ लाख मुंबईकरांनी प्रवास केला. त्यातून बेस्ट उपक्रमाला जवळपास पाच कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले. मेगाब्लॉक दरम्यान १ जून रोजी बेस्टकडून ३४९ अतिरिक्त फेऱ्या तर २ जून रोजी २२७ अतिरिक्त फेरीचे नियोजन करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे या दोन ठिकाणी फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे घेण्यात आलेल्या जम्बो ब्लॉकचा परिणाम लोकल वाहतुकीवर झाला. अनेक गाड्या परळ आणि भायखळ्यापर्यंतच चालविण्यात येत होत्या. लोकलच्या कोंडीमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमाकडून अतिरिक्त बसगाड्या चालविण्यात आल्या. ३१ मे रात्री १२:३० पासून २ जून दुपारी १२:३० पर्यंत नियमित बस फेऱ्यांव्यतिरिक्त या अतिरिक्त सेवा देण्यात आल्या. 

ब्लॉकनंतर असा होणार फायदा
 भविष्यात रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिकाधिक सुखकर व्हावा यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला होता. ठाणे येथील फलाटांच्या विस्तारीकरणाचा फायदा लोकलला होणार आहे, तर सीएसएमटी येथील फलाटांच्या विस्तारीकरणाचा फायदा हा मेल आणि एक्स्प्रेसला होणार आहे.
 सीएसएमटी येथील फलाटांच्या रुंदीकरणामुळे २४ डब्यांच्या गाड्या थांबण्यास आणखी मदत होणार असून, लांब पल्ल्यांच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. शिवाय रेल्वे प्रशासनालादेखील २४ डब्यांच्या गाड्या फलाटावर लावताना अडचणी येणार नाहीत, असे मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: BEST's 'jumbo' revenue during the megablock period was 55 lakh passengers, 5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.