रेल्वे सेवा सुरू झाल्याने बेस्टच्या प्रवासी संख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:07 AM2021-02-10T04:07:17+5:302021-02-10T04:07:17+5:30
आठवडाभरात एक लाख प्रवासी झाले कमी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल सेवा १ ...
आठवडाभरात एक लाख प्रवासी झाले कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या प्रवासी संख्येत गेल्या आठवडाभरात सुमारे एक लाख एवढी घट झाली.
मार्च २०२०मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे २३ मार्चपासून मुंबईतील लोकल सेवा सर्वांसाठी बंद करण्यात आली. त्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्ट बसगाड्यांनी दिलासा दिला, तर ‘मिशन बिगीन अगेन’चा पहिला टप्पा जून महिन्यात सुरू झाल्यानंतरही सर्वसामान्य मुंबईकरांना बेस्ट बसचाच आधार होता. या काळात प्रवासी संख्या वाढून १७ लाखांवर पोहाेचली.
मुंबईतील सर्व व्यवहार आता हळूहळू सुरू झाले आहेत. त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत बसगाड्यांमधून दररोज सरासरी २८ लाख प्रवासी प्रवास करीत होते. मात्र, १ फेब्रुवारी २०२१पासून लोकल सेवा मुंबईकरांसाठी सुरू करण्यात आली. यामुळे पुन्हा एकदा काही प्रवासी रेल्वे प्रवासाकडे वळले आहेत. याचा परिणाम बेस्टच्या प्रवासी संख्येवर झाला. गेल्या आठवड्यात दररोज सरासरी १० ते २० हजार प्रवासी संख्येत घट दिसून आली.
- या मार्गांकडे वळवणार लक्ष
* २९ जानेवारी रोजी बेस्ट उपक्रमामार्फत ४३०१ बस गाड्या चालवण्यात आल्या होत्या. या बसगाड्यांमधून २६ लाख प्रवाशांनी प्रवास केला, तर ५ फेब्रुवारी रोजी ४,१३८ बसगाड्यांमधून २५ लाख प्रवाशांनी प्रवास केला.
* छोट्या मार्गांवर म्हणजे घरापासून रेल्वेस्थानकापर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ७० टक्के आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने यापुढे अशा मार्गांना प्राधान्य देऊन जादा बस चालवण्याचे निश्चित केले आहे.