बेस्टच्या प्रवासी संख्येत एका आठवड्यात दीड लाखांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:09 AM2021-09-08T04:09:07+5:302021-09-08T04:09:07+5:30
मुंबई - कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत असला तरी मुंबईत सध्या निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे बेस्ट ...
मुंबई - कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत असला तरी मुंबईत सध्या निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. मागील आठवड्यात बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून २३ लाख ७७ हजार प्रवासी दररोज प्रवास करीत होते. मात्र, सोमवारी प्रवाशांचा आकडा २५ लाख २५ हजार एवढा होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून मुंबईत लॉकडाऊन लागू केल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्ट बससेवेने दिलासा दिला. या काळात लाखभर कर्मचारीच बसगाड्यांनी प्रवास करीत होते. जून २०२० मध्ये ‘मिशन बिगीन अगेन’ सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या अडीच लाखांवर पोहोचली. त्यानंतरही रेल्वे प्रवास सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आल्याने बेस्ट बसगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होऊ लागली. दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना १५ ऑगस्टपासून रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. बेस्टच्या प्रवासी संख्येतही वाढ होऊ लागली आहे.
निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर मुंबईतील बहुतांशी खासगी कार्यालये सुरू झाली आहेत. मात्र, रेल्वेतून प्रवास करण्यासाठी सरकारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि आता दोन डोस घेतलेल्या नागरिकांना परवानगी आहे. मात्र, बेस्ट बसमधून प्रवास करण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची गरज लागत नाही. त्यामुळे बहुतांशी प्रवासी बेस्ट बसकडे वळत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी, मागील आठवडाभरात प्रवासी संख्येत दीड लाखांची वाढ झाली आहे.
तारीख... प्रवासी..... उत्पन्न
३० ऑगस्ट - २३,७७,१०२.....१,९०,८७,९१८
६ सप्टेंबर - २५,२५,०७४.....२,०३,८३,८८२