मुंबई : महापालिकेच्या सर्व ४६ वसाहतींमध्ये उत्तम सुविधा पुरवल्या जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कामांची पाहणी तसेच स्वच्छता कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दादर येथील कासारवाडी कामगार वसाहतीत आले होते. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. या प्रसंगी खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, आमदार ॲड. मनीषा कायंदे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी आणि डॉ. सुधाकर शिंदे यांची यावेळी उपस्थिती होती.
स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि अभ्यासिकेचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी या वसाहतीमध्ये भेट दिली होती. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्या पूर्ण करण्याचा शब्द आपण दिला होता. तो पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईचे आरोग्य चांगले ठेवणारे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय कोणत्या परिस्थितीत राहतात हे पाहावे म्हणून त्यावेळी भेट दिली होती. तसेच विविध स्पर्धा परीक्षांतून मुले मोठ्या पदावर जाण्यासाठी अभ्यासिका उपयुक्त ठरणार असल्याचेही शिंदे म्हणाले.