Join us

मुंबईत उपाशी जगण्यापेक्षा गावी गेलेले बरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:05 AM

उत्तर प्रदेश, बिहारला जाणाऱ्या गाड्यांना गर्दीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मिनी लॉकडाऊनमुळे मोठ्या शहरांमधील उद्योगधंदे पुन्हा एकदा ठप्प ...

उत्तर प्रदेश, बिहारला जाणाऱ्या गाड्यांना गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मिनी लॉकडाऊनमुळे मोठ्या शहरांमधील उद्योगधंदे पुन्हा एकदा ठप्प हाेऊ लागले आहेत. परिणामी, हाताला काम नसल्याने कामगारांवर खूप आर्थिक संकट ओढावले आहे. शहरात उपाशी जगण्यापेक्षा मूळ गावाकडे परतण्यास त्यांच्याकडून पसंती देण्यात येत असल्याने रेल्वे स्थानकावरील गर्दीत वाढ झाली आहे.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, एलटीटी, पनवेल तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस येथून गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत माेठी वाढ झाली आहे. एलटीटी टर्मिनसमधून लांब पल्ल्याच्या दरराेज २० हून अधिक गाड्या चालविण्यात येतात. त्यामध्ये सर्वाधिक गाड्या या उत्तर प्रदेश, बिहार, पाटणाकरता धावतात. या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात.

मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. यामुळे मुंबईत कामानिमित्त गेलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवली होती. एवढेच नव्हे तर, त्या वेळी वाहतूकही पूर्णपणे बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश होते. त्यामुळे दुहेरी संकट कामगारांसमोर होते. जवळ असलेली सर्व जमापुंजी संपल्यामुळे शहरात दिवस काढणे त्यांना खूप कठीण होऊन बसले होते.

केवळ अत्यावश्यक सेवांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने त्यांनी आपले गाव गाठले. काहींनी तर चक्क पायीच गावाची वाट धरल्याचे पाहायला मिळाले. परप्रांतातील मजुरांचीही हीच अवस्था झाली होती. शेकडो किलोमीटर अंतर कापून ते आपल्या मूळ गावी पोहोचले. आता मात्र वाहतूक पूर्णपणे सुरळीत असल्याने वाढत्या रुग्णसंख्येच्या काळातही मुंबईमधून रेल्वे गाड्या पूर्ण प्रवासी क्षमतेने भरून जात आहेत.

* एलटीटी रेल्वे स्थानकावर प्रवासी वाढले

काेराेना रुग्णांची संख्या वाढू लागली. निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धूसर झाल्याने दुकाने, उपाहारगृहे, छाेट्या-छाेट्या कंपन्यांमधील कामगार, लघु व्यावसायिक, राेजंदारीवरील कामगार लॉकडाऊनच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. त्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहारच्या मजुरांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे राज्याबाहेरील मजूर घाबरुन मूळ गावी परतू लागले आहेत. परिणामी लाेकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) रेल्वे स्थानकावर गर्दी होत आहे.

* कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता

बिगारी काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवताे. गेल्यावर्षी टाळेबंदीत पायीच गावी चालत गेलाे. नाेव्हेंबर महिन्यात कामाकरिता पुन्हा मुंबईत आलाे. कुटुंबासह सायन-काेळीवाडा येथे भाड्याने राहताे. संपूर्ण व्यवहार ठप्प झाले तर जगायचे कसे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या भीतीने पुन्हा गावी जाण्याचा निर्णय घेतला.

- पवनकुमार चाैरसिया, कामगार

* काय हाेईल, काहीच माहिती नाही

टाळेबंदीमुळे नाेकरी गेल्याने श्रमिक ट्रेनने बिहारला गेलाे हाेताे. दिवाळीच्या सुमारास कामानिमित्त पुन्हा मुंबईत आलाे. मिळेल ते काम करताे. काेराेना गेला की कुटुंबाला आणावे या विचाराने त्यांना आणले नाही. आता काेराेना पुन्हा वाढत आहे. काय हाेईल काही माहिती नाही. त्यामुळे वाराणसीला पुन्हा जात आहे.

- संताेष दुबे, कामगार

* तिकिटासाठी गावावरुन पैसे मागून घेतले

मी अँटॉप हिल येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होतो. लॉकडाऊनच्या भीतीने आम्हाला कामावरुन कमी करण्यात आले आहे. गेल्या महिन्याचा पगारही मिळाला नाही. कोरोना वाढत आहे, त्यामुळे मी गावावरून तिकिटासाठी पैसे मागवून घेतले.

- सौरभ मिश्रा, कामगार

................................