चिपी विमानतळावरून गणेशोत्सवापूर्वी उत्तम सेवा अन् अधिक उड्डाणे, पालकमंत्री चव्हाण यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 11:33 AM2023-08-02T11:33:19+5:302023-08-02T11:34:54+5:30
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून सध्या सुरू असलेली विमान प्रवासाची सुविधा गणेशोत्सवापूर्वी अधिक नियमित आणि उड्डाणांची संख्यादेखील वाढवली ...
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून सध्या सुरू असलेली विमान प्रवासाची सुविधा गणेशोत्सवापूर्वी अधिक नियमित आणि उड्डाणांची संख्यादेखील वाढवली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत सांगितले. या दोन्ही गोष्टींसाठी आवश्यक तो पाठपुरावा मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारकडे करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमानी, पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीनेदेखील ही विमान प्रवास सेवा अधिक जास्त प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, सध्या या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात सुरळीतरीत्या विमान प्रवास सेवा प्रवाशांना उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याचा संबंधित अधिकाऱ्यांशी आढावा घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली, अशी माहिती देऊन मंत्री चव्हाण म्हणाले की, याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची शासनाची भूमिका आहे, आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.