Join us

बेस्टचे खड्डे खणणारे कामगार संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 2:37 AM

गेल्या १० वर्षांपासून बेस्ट उपक्रमात रोजंदारी कामगार म्हणून काम करणा-या ८३५ कामगारांनी बुधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे.

मुंबई : गेल्या १० वर्षांपासून बेस्ट उपक्रमात रोजंदारी कामगार म्हणून काम करणा-या ८३५ कामगारांनी बुधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाची केबल टाकणे, रस्त्यावर खड्डे खणणे आणि तत्सम कामे ठप्प पडणार असल्याचा दावा बॉम्बे इलेक्ट्रीक वर्कर्स युनियनने केला आहे.

डॉकयार्ड रोड येथील कसारा बंदर मार्गावरील बिजली भवनसमोर रोजंदारी कामगारांनी धरणे आंदोलन केले. बेस्टने कायम सेवेत घ्यावे, ही कामगारांची प्रमुख मागणी होती. संबंधित ८३५ कामगार खड्डे खणण्यापासून तांत्रिक कामगारांसोबत मदतनीस म्हणून काम करतात. कॅलेंडर वर्षांत कमीतकमी २४० दिवस व त्यापेक्षा जास्त दिवस काम करणा-या कामगारांना बेस्ट उपक्रमाच्या कायम पदावर सामावून घेण्याचा करार बॉम्बे इलेक्ट्रीक वर्कर्स युनियनसोबत प्रशासनाने ७ नोव्हेंबर २००७ व १ आॅगस्ट २०१२ रोजी केलेला आहे. मात्र कराराची अंमलबजावणी प्रशासन करत नाही. त्यामुळेच कामबंद आंदोलनाची हाक दिल्याचे संघटनेचे सरचिटणीस विठ्ठल गायकवाड यांनी सांगितले.

बेस्ट उपक्रमाच्या आस्थापन अनुसूचीवर असलेली रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी युनियनने केली आहे. या रिक्त पदांवर संबंधित रोजंदारी कामगारांना भरती करून कायम करण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. शासनाने ऊर्जा व उद्योग विभागासाठी किमान वेतन कायद्यानुसार वेतन प्रदान करण्याचा अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. मात्र त्याचे पालन बेस्ट उपक्रमात अद्याप होत नसल्याचा युनियनचा आरोप आहे.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका