Join us

घरफोड्यांपासून सावध राहा

By admin | Published: July 23, 2015 3:33 AM

मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरू असल्याने उपनगरात घरफोडी करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट वाढला आहे. पावसाच्या दिवसांत शहरात घरफोडीचे प्रमाण वाढीस लागते

गौरी टेंबकर-कलगुटकर, मुंबईमुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरू असल्याने उपनगरात घरफोडी करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट वाढला आहे. पावसाच्या दिवसांत शहरात घरफोडीचे प्रमाण वाढीस लागते. त्यामुळे पोलिसांप्रमाणे स्थानिकांनीही सतर्क राहून या टोळ्यांवर अंकुश घालण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.अतिरिक्त पोलीस आयुक्त फत्तेसिंग पाटील ‘लोकमत’ला या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाले, या विभागातील सर्व पोलीस ठाण्यांना पावसाळी टोळ्यांपासून सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिकांनीदेखील काही संशयित हालचाली किंवा व्यक्ती नजरेस पडल्यास त्याची माहिती पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर द्यावी. तसेच सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. सेफ्टी डोअर, खिडक्यांच्या ग्रिल यांची वेळोवेळी तपासणी करावी, असेही त्यांनी नमूद केले. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना शक्यतो घरी एकटे ठेवू नका. तसेच त्यांना संपर्क करण्यासाठीची योग्य ती व्यवस्था करा. तसेच त्यांच्या संपर्कात राहा. कार्यालय तसेच घराबाहेर पार्क करण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये जीपीएस यंत्रणेचा पर्याय अवलंब करून चोऱ्यांचा प्रतिबंध करता येतो.