लॉटरी लागल्याचे ई-मेल किंवा मेसेज आल्यास सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:11 AM2021-08-17T04:11:23+5:302021-08-17T04:11:23+5:30

मुंबई : कोरोनाच्या काळात रियालिटी शो तसेच शॉपिंग वेबसाइटच्या नावाने फोन, संदेश अथवा मेल पाठवून लॉटरी लागल्याचे आमिष दाखवले ...

Beware of e-mails or messages about lotteries | लॉटरी लागल्याचे ई-मेल किंवा मेसेज आल्यास सावधान

लॉटरी लागल्याचे ई-मेल किंवा मेसेज आल्यास सावधान

Next

मुंबई : कोरोनाच्या काळात रियालिटी शो तसेच शॉपिंग वेबसाइटच्या नावाने फोन, संदेश अथवा मेल पाठवून लॉटरी लागल्याचे आमिष दाखवले जात आहे. यात सावज जाळ्यात अडकताच त्याचे खाते रिकामे होत आहे. त्यामुळे ठगांच्या आमिषाला बळी पडू नका असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

कफपरेड परिसरात २४ वर्षीय तक्रारदार महिला कुटुंबीयासोबत राहते. पती टॅक्सी चालक असून त्यावर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. या महिलेला विक्रम सिंग नावाने केबीसीमधून बोलत असल्याचा फोन आला. त्याने महिलेला ३५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगितले. लॉटरीचे पैसे हवे असल्यास नोंदणीसाठी १२ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यांनी चेन विकून १२ हजार रुपये पाठविले. पुढे, आणखी पैशांची मागणी करताच त्यांनी शेजारच्याकडून कर्ज घेत पैसे पाठविले. विविध कारणे देत एकूण ४६ हजार रुपये त्यांच्याकडून उकळण्यात आले. पुढे आणखी पैशांची मागणी होताच त्यांना संशय आला. त्यांनी दिलेले पैसे परत करण्यास सांगितले. त्यानंतर ठग नॉट रिचेबल झाला. याप्रकरणी कफपरेड पोलीस अधिक तपास करत आहेत.

अशाच प्रकारे संदेश तसेच मेल पाठवून सायबर ठग फसवणूक करत आहेत. यात अनेकदा स्पूफिंग मेल, संदेशाचा आधार घेतला जातो. त्यामुळे संबंधित माहिती अधिकृत संस्थाकडून आल्याचे भासते. त्यामुळे अशा फसव्या जाहिराती, लॉटरी आमिषापासून दूर राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

अनोळखी लिंक उघडू नका...

मेल संदेश उघडण्यापूर्वी खातरजमा करा. अनोळखी लिंक, क्यूआर कोड स्कॅन करू नका. ही लिंक डाऊनलोड केल्यास मालवेअर किंवा व्हायरसद्वारे भ्रमणध्वनी, संगणकाचा ताबा घेऊन त्यातील संवेदनशील माहिती भामटे चोरतात. त्याआधारे आर्थिक फसवणूक, माहितीची चोरी, बदनामी किंवा अन्य गुन्हे घडू शकतात. त्यामुळे अशा संदेशापासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

अधिकृत संकेतस्थळाला द्या प्राधान्य...

गुगलद्वारे माहिती मिळवताना संबंधित आस्थापनेच्या अधिकृत संकेतस्थळाचा शोध घ्यावा. त्यावरून संपर्क क्रमांक किंवा अन्य तपशील घ्यावेत. सर्चिंग दरम्यान कुठल्याही संकेतस्थळाची अधिकृतता पडताळणे गरजेचे आहे. त्यासाठी त्याची यूआरएल https पासून सुरू होत असेल, तर ते संकेतस्थळ सुरक्षित आहे. एस म्हणजे सुरक्षित. फक्त http असेल, तर त्या संकेतस्थळावर जाणे टाळा. जेणेकरून फसवणूक होणार नाही असे सायबर पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: Beware of e-mails or messages about lotteries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.