Join us

सावधान... ! दिवाळीत खाद्यपदार्थ जपून खा , ३०० किलो भेसळयुक्त खवा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 12:32 PM

राजस्थान व गुजरात या भागातून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पदार्थ राज्यात येतात.

मुंबई : सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांमधील भेसळीचे प्रमाण वाढते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन अधिक सतर्कपणे यावर लक्ष ठेवून असते. या पार्श्वभूमीवर, दिवाळीच्या तोंडावर परराज्यातून मुंबई, पुणे आणि ठाण्यात आलेला सुमारे ३०० किलोपेक्षा अधिक भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने याप्रकरणी पोलिसांसह कार्यवाही करत असून नागरिकांनी याबाबत जागरुक असावे, असे आवाहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. राजस्थान व गुजरात या भागातून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पदार्थ राज्यात येतात. त्यामुळे याबाबत माहिती मिळताच शुक्रवारी पालघर जिल्ह्यात तपासणी नाक्यावर  खवा वाहतूक करणाऱ्या एक खासगी ट्रॅव्हल बसवर कारवाई करण्यात आली आहे. भेसळयुक्त मिठाईबाबतची सातत्याने तपासणी करून कारवाई केली जात आहे. यासाठी १३ पथके कार्यरत आहेत, वारंवार तपासणी सुरू आहे. तरीही ग्राहकांनी मिठाई खरेदी करताना काळजी बाळगावी. तक्रार असल्यास तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शैलेश आढाव यांनी केले आहे. नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन संबंधित अन्न पदार्थांचा उर्वरित साठा जप्त करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.

अशी ओळखा भेसळ ?   मिठाई वा खवा तळहातावर घेऊन रगडा. तो जर कोरडा न होता तेलकट वा वास आला तर भेसळ समजावी. मिठाईचा तुकडा तोंडात टाकताच, तेलकट वाटला तर त्यात भेसळ समजावी. मिठाई वा खव्यावर टिंचर आयोडिनचे दोन थेंब टाका. भेसळ नसल्याने त्यावर काहीही परिणाम होणार नाही.   भेसळ असल्यास थेंबाची जागा काळसर होईल. मिठाई वा खव्यावर हायड्रोलिक ॲसिड टाका. मिठाईचा रंग जांभळा झाल्यास त्या मिठाईत मिटॅनील हे वापरल्याचे सिद्ध होईल.    भेसळयुक्त मिठाईमध्ये शुद्ध खव्यापासून न बनविता, अर्ध्या प्रमाणात खावा, त्यात मैदा वा अन्य पीठ वापरले जाते. त्यात काही रासायनिक पदार्थही वापरले जातात. त्यामुळे त्यात खव्याप्रमाणे चिकटपणा येऊ शकेल. 

टॅग्स :मुंबईदिवाळी 2023