- हेमंत बावकर
मुंबई : देशात 1000, 500 च्या बनावट नोटा हद्दपार करण्याच्या नोटाबंदीचा उद्देश विफल झाला असून बाजारात नव्या नोटांच्या बनावट नोटा फिरू लागल्या आहेत. घाईमध्ये असताना व्यापाऱ्यांकडे या नोटा गिऱ्हाईक खपवत असल्याने व्यापाऱ्यांसह अनेकांना नुकसान सहन करावे लागत आहे. धक्कादायक म्हणजे बुलडाण्यात कालच 1 कोटींच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.
लोअर परेल येथे दोन भाजी विक्रेत्यांना हा फटका बसला आहे. सायंकाळच्या वेळी कार्यालये सुटत असल्याने भाजीपाला व इतर वस्तू घेण्यासाठी गर्दी होत असते. यामुळे विक्रेतेही ग्राहकांनी दिलेली नोट केवळ रंग पाहून किंवा दुमडलेली असते तशीच घेतात. यामुळे त्यांना खरी की खोटी नोट आहे हे समजत नाही. नंतर कोणालातरी सुटे पैसे द्यायचे झाल्यास किंवा रात्री हिशेब घेताना बनावट नोट आढळल्याचे लक्षात येते.
या भाजीविक्रेत्यांपैकी एकाकडे 500 ची हुबेहूब नोट आली होती. मात्र, त्याच्या सजगपणामुळे त्याने ती नोट खोटी असल्याचे ग्राहकाला सांगितले. विक्रेता जरी नुकसानीपासून वाचला असला तरीही त्या ग्राहकाला ज्याने ही बनावट नोट दिली तो व्यक्ती फायद्यात आणि ग्राहकाला नुकसान सोसावे लागले आहे. तर दुसऱ्या विक्रेत्याला 200 रुपयांची हुबेहुब नोट दिली गेली. रस्त्यावरील फ्लुरोसंट लाईटमुळे रंग पाहून त्याने नोट घेतली. मात्र, रात्री उशिरा त्याच्या नोट बनावट असल्याचे लक्षात आले.
अशाप्रकारे बनावट नोटा बाजारात फिरू लागल्या असून यामुळे ग्राहकांना आणि विक्रेत्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. या नोटा खेळण्यातल्या असून हुबेहूब नव्या नोटांसारख्याच दिसतात. काही नोटांवर सिरिअल नंबरच्या जागी 'FULL OF FUN' असेही लिहिलेले असते. तर बऱ्याच बनावट नोटांवर सिरिअल नंबर असतात. तसेच बाजारात 5, 10 रुपयांचे कॉईनही हुबेहूब इराण, इराकच्या कॉईनसारखे आले आहेत. यामुळे कवडी मोलाची किंमत असलेले हे कॉईन रुपये म्हणून हातात दिले जातात. यामुळेही फसवणूक होते.
नोटा बनविण्यासाठी आरबीआय विशिष्ट प्रकारचा कागद वापरते. तो जाड आणि सहसा मऊ न पडणारा असतो. या बनावट नोटांचा कागद मऊ आणि वजनाने हलका होता.
नुकसान टाळण्यासाठी खपविण्याचे प्रकार?बऱ्याचदा नुकसान टाळण्यासाठी माहिती असूनही काही व्यापारी, विक्रेते किंवा ग्राहक या बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न करतात. यामुळे एकाचे नुकसान जरी होत नसले तरीही समोरच्याचे होते. महत्वाचे म्हणजे देशाचे नुकसान होते. यामुळे अशी बनावट नोट आल्यास ती फाडून किंवा जाळून टाकावी.
एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त, बोराखेडी पोलिसांची कारवाई