लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोकणातील पूरग्रस्तांसाठी सगळीकडून मदतीचे हात पुढे येत असताना सायबर ठग याचाही फायदा उचलताना दिसत आहेत. बनावट संस्थांच्या नावाखाली ही मंडळी पैसे उकळताना दिसत आहेत. त्यामुळे मदत करताना त्याची अधिकृतता पडताळणे गरजेचे असल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाकडून सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायबर ठग सोशल मीडियावर बनावट संस्थांच्या नावे खाते तयार करून त्यांच्या प्रोफाइलवर पैसे देण्यासाठी बँकेची लिंक देतात. त्यावर ऑनलाइन पद्धतीने देणगी देण्याचे आवाहन करण्यात येते. प्रत्यक्षात ती मदत सायबर ठगांच्या खात्यात जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. देणगी देण्यापूर्वी सामाजिक संस्थेची अधिकृतता पडताळून पाहा. आर्थिक व्यवहार करणारी प्रणाली पडताळून पाहा, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात येत आहे.
सायबर ठगांकडून कोरोना महामारीच्या उपचारासह, विविध मदतीच्या नावाखाली फसवणूक सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठलाही व्यवहार करण्यापूर्वी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे सायबर विभागाने सांगितले.