नोकरभरतीच्या फसव्या जाहिरातींपासून सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:07 AM2021-06-16T04:07:01+5:302021-06-16T04:07:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एअर इंडियामध्ये विविध पदांची भरती सुरू असल्याची जाहिरात सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एअर इंडियामध्ये विविध पदांची भरती सुरू असल्याची जाहिरात सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकारही समोर आले आहे. ही जाहिरात पूर्णतः फसवी असून, नागरिकांनी त्यापासून सावध राहावे, असे आवाहन एअर इंडियाकडून करण्यात आले आहे.
सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियामध्ये ग्राऊंड स्टाफ, मॅकेनिकल, कार्यालयीन कर्मचारी, केबीन क्रू आणि अन्य पदांकरिता नोकरभरती सुरू असल्याची जाहिरात विविध पोर्टल आणि सोशल मीडियावर केली जात आहे. कंपनीचे बनावट लेटरहेड, लोगो आणि शिक्के तयार करून तरुण वर्गाची दिशाभूल केली जात आहे. अमूक रक्कम भरा आणि हमखास नोकरी मिळवा, असे आमिषही दाखविले जात आहे. परंतु, एअर इंडियामध्ये अशाप्रकारे कोणतीही भरती सुरू नसून, निव्वळ फसवणुकीच्या हेतूने अज्ञात व्यक्तींकडून हे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे कोणीही अशा फसव्या आमिषांना बळी पडू नये, असे एअर इंडियाने म्हटले आहे.
जेव्हा कधी एअर इंडियामध्ये नोकरभरती निघते, त्यावेळी आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात दिली जाते. शिवाय एअर इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिली जाते. त्यामुळे फसव्या जाहिरांतीवर विश्वास ठेवू नका. अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाल्यास एअर इंडिया कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.