Join us

सावधान, मुंबईतील रस्त्यांवरून जाताय.. खड्ड्यांमुळे वाढू शकते पाठदुखी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:06 AM

मुंबई : मुंबईत गेले अनेक दिवस सतत पाऊस पडत असल्याने रस्त्यांना तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईकरांना ...

मुंबई : मुंबईत गेले अनेक दिवस सतत पाऊस पडत असल्याने रस्त्यांना तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईकरांना खड्ड्यांचा त्रास जाणवू लागला आहे. मुंबईत ठिकठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. मुख्य महामार्गासोबतच उड्डाणपुलांवर देखील खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांना पाठीचे आजार झाले आहेत, तर अनेक वाहनचालकांना महिन्याला गाडीच्या दुरुस्तीसाठी हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. यामुळे आता हा त्रास अजून किती वर्षे सहन करायचा, असा सवाल मुंबईकर उपस्थित करत आहेत.

मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रूतगती महामार्ग, एलबीएस मार्ग, सायन-पनवेल मार्ग, शिवडी-चेंबूर मार्ग, घाटकोपर- मानखुर्द लिंक रोड हे सर्व महत्त्वाचे रस्ते आता खड्ड्यांचे हॉटस्पॉट बनले आहेत. त्यामुळे या मार्गावरून जाताना दररोज अनेक दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. त्यामुळे पावसाळा आणि खड्डे हे जणू समीकरणच बनले आहे. लाखो रुपये खर्च करून देखील मुंबईतील रस्त्यांवर शेवटी खड्डाच उरत असेल तर याला महानगरपालिकेकडे उपाय काय आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

वाहनांचा खर्च वाढला, पाठदुखीही वाढली

मी माझ्या कार्यालयात दररोज माझी दुचाकी घेऊन जातो. दररोज पाऊस पडत असल्यामुळे प्रत्येक दिवशी रस्त्यात नवीन खड्डा पडलेला असतो. यामुळे रस्ता पाठ असून देखील खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी गाडी खड्ड्यांमधून जाते व स्पेअर पार्ट ढिले होतात. यामुळे गाडीचे सस्पेन्शन, टायरचे नुकसान होते. त्यामुळे महिन्याला गाडी किमान दोन ते तीन दिवस दुरुस्तीसाठी गॅरेजला ठेवावीच लागते.

- विक्रांत चौगुले.

मी रिक्षाचालक असल्याने दररोज मुंबईत किमान शंभर किलोमीटर रिक्षा चालवितो. खड्ड्यांमुळे पाठदुखी वाढली आहे, तसेच गाडीच्या दुरुस्तीसाठी देखील मोठा खर्च येत आहे. त्यामुळे महिन्याची अर्धी कमाई डॉक्टर व मेकॅनिकला द्यावी लागत आहे. या खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाय काढणे गरजेचे आहे, अन्यथा मुंबईत येत्या काळात खड्ड्यांमुळे अनेक जीव जाऊ शकतात.

- संतोष कदम.

खड्ड्यांमुळे होऊ शकतो मणक्याचा त्रास

चारचाकी वाहनांपेक्षा दुचाकी व रिक्षा या वाहनांना खड्ड्यांमुळे अधिक त्रास सहन करावा लागतो. मणक्याला आधार न देता दुचाकीवर बसावे लागते. यामुळे गाडी खड्ड्यात गेल्यानंतर थेट मणक्याला झटका बसतो. यामुळे पाठदुखी, कंबरदुखी यांसारखे आजार उद्भवतात. अनेक तरुणांना याची जाणीव खूप उशिरा होते. मात्र, खड्ड्यांमधून गाडी चालवताना सावध राहणे गरजेचे आहे.

- डॉ. हर्षल माने.