खबरदार! गुगलच्या गुगलीने २९ हजारांना फटका; तुम्हीही होऊ शकता शिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 12:35 AM2019-11-02T00:35:12+5:302019-11-02T00:36:00+5:30
पवईतील मिलिंदनगरमध्ये राहत असलेल्या २६ वर्षीय तरुणाची यात फसवणूक झाली आहे.
मुंबई : गुगलवरून गॅस सर्विस एजन्सीचा नंबर शोधणे तरुणाला भलतेच महागात पडला आहे. याच गुगलवरील ठगाने तरुणाचा विश्वास संपादन करत, गुगल पेद्वारे २९ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.
पवईतील मिलिंदनगरमध्ये राहत असलेल्या २६ वर्षीय तरुणाची यात फसवणूक झाली आहे. घरातील गॅस सिलिंडर जास्त गरम होत असल्याने बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास आकाशने गुगलवरून गॅस एजन्सीचा नंंबर शोधून त्यावर कॉल केला. आपली तक्रार सांगत आकाशने गॅस सर्व्हिसची मागणी केली. त्यावेळी समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने गॅस सर्व्हिस बुकिंग करण्यासाठी १० रुपये आॅनलाइन भरावे लागतील, असे सांगून फोन पे किंवा गुगल पे अकाउंट आहे का? अशी विचारणा केली. त्यानुसार, तरुणाने गुगल पे बाबत सांगताच आरोपींकडून एक लिंक त्याच्या मोबाइलवर पाठविण्यात आली.
त्यानुसार, त्याने व्यवहार करताच त्याच्या खात्यातून आर्थिक व्यवहारोंच्या माध्यामातून २९ हजार ९९७ रुपये खात्यातून वजा झाल्याचा संदेश धडकला. आकाशने लगेचच त्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो क्रमांक बंद होता. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.