मुंबई : भारतात १०० टक्के डिजिटल व्यवहार व्हावेत, यासाठी सरकारकडून विविध पावले उचलली जात आहेत. परंतु, हॅकिंगसारखे प्रकार रोखण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी काय करता येईल, सुरक्षित व्यवहार कसा करावा किंवा हॅकर्सच्या नजरेतून वाचण्याचे मार्ग कोणते आहेेत, अशा विविध प्रश्नांवर सायबर तज्ज्ञ निखिल महाडेश्वर यांच्याशी केलेली चर्चा.
....................
१. ऑनलाइन फसवणूक कशी होते? हॅकर्सच्या कार्यपद्धतीविषयी माहिती द्या.
दीड-दोन जीबी डेटा कमी पैशात मिळू लागल्यापासून भारतात इंटरनेट वापरकर्त्यांचे प्रमाण वाढले आहे. ते इतके की एखादी फॉरवर्डेड लिंकही आपण कोणतीही शहानिशा न करता उघडतो. इथेच हॅकर्सचे फावते. त्या लिंकद्वारे वापरकर्त्याचा मोबाइल हॅक करून हवी ती माहिती मिळवता येते. हल्ली बँकांच्या संकेतस्थळांप्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या वेबसाईट हॅकर्सनी तयार केल्या आहेत. त्यावर लॉगिन करताच ग्राहकाची माहिती चोरून अगदी सेकंदाच्या फरकाने त्याच्या खात्यातील रक्कम वळविली जाते.
२. हॅकर्सचे मुख्य टार्गेट कोण?
सार्वजनिक वायफायचा वापर करणारे हॅकर्सचे मुख्य टार्गेट आहेत. या माध्यमातून वापरकर्त्याच्या मोबाइलचा ताबा सहज मिळवता येतो. फेसबूक किंवा इन्स्टाग्रामवर चॅलेंजच्या (उदा. बेस्ट जोडी, बेस्ट फ्रेंड, बेस्ट फादर...) आहारी गेलेल्यांची संख्या सध्या वाढत आहे. हे चॅलेंजवेडे सध्या हॅकर्सचे सावज ठरत आहेत. त्याशिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मवर सवलती, ई-कॉमर्स कंपन्यांवरील उत्पादने निम्म्या किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवूनही फसवणूक केली जात आहे.
३. सुरक्षित व्यवहार कसा करावा?
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोणतीही अनोळखी लिंक उघडताना दहावेळा खात्री करा. डिजिटल व्यवहार करताना संबंधित वेबसाईटच्या लिंकवरील प्रत्येक अक्षरावर नजर फिरवा, त्यात काही संशयास्पद वाटल्यास व्यवहार करू नका. हा प्रकार संबंधित आस्थापनाच्या नजरेस आणून द्या. सोशल मीडियावर गरजेपुरती माहिती द्या. मोबाइल क्रमांक, ई-मेल किंवा अन्य खासगी माहिती देणे सहसा टाळा. स्वतःचा फोटो अपलोड करताना सेफगार्डचा वापर करा. आपला मोबाइल जास्तीतजास्त सुरक्षित कसा राहील, याची काळजी घ्या. आणि हो, इंटरनेटशी निगडित कोणतीही कृती करताना लक्ष ठेवा की, हॅकर्स तुमच्या पैशांवर डल्ला मारण्याच्या तयारीत तर नाहीत ना?
(मुलाखत : सुहास शेलार)
..................................................