मोदींच्या दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांच्या हातात झाडू
By admin | Published: May 6, 2016 12:47 AM2016-05-06T00:47:57+5:302016-05-06T00:47:57+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी मे महिन्याच्या अखेरीस स्वच्छ भारत मिशनचा आढावा घेण्याकरिता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असल्याने सध्या थंडावलेल्या या अभियानाकरिता प्रत्येक आठवड्यातील
- राजू काळे , भार्इंदर
पंतप्रधान नरेंद्र मोदी मे महिन्याच्या अखेरीस स्वच्छ भारत मिशनचा आढावा घेण्याकरिता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असल्याने सध्या थंडावलेल्या या अभियानाकरिता प्रत्येक आठवड्यातील दोन तास यानुसार वर्षातील १०० तास प्रथम व द्वितीय वर्ग अधिकाऱ्यांनी द्यावे, असे आदेश मीरा-भार्इंदर पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी दिले आहेत.
मोदी यांनी देशभरात स्वच्छ भारत अभियानाला २०१४ मधील गांधी जयंतीपासून सुरुवात केली. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी सर्व प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी कधी नव्हे ते हातात झाडू घेऊन सफाईसाठी रस्त्यावर उतरले. त्यावेळी राबविलेली स्वच्छता मोहीम यशस्वीपणे सुरु असल्याचा दावा असला तरी प्रत्यक्षात एक दिवसीय मोहिमेनंतर ती थंडावली. त्यामुळे परिस्थिती ‘जैसे थे’ झाली. स्वच्छता मोहीम कायमस्वरुपी सुरु रहावी, यासाठी मीरा-भार्इंदर पालिकेचे तत्कालीन आयुक्त सुभाष लाखे यांनी पालिका शाळांसह पालिका आस्थापनांमधील स्वच्छतागृहे, सार्वजनिक शौचालयांमधील स्वच्छतेवर नियंत्रण ठेवण्याची कामे प्रत्येक अधिकाऱ्यांना वाटून दिली होती. सुरुवातीला स्वच्छतेची पाहणी झाली. त्यानंतर मात्र ती बंद झाली. २५ मेला पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून ते राज्यातील स्वच्छतेचा आढावा घेणार असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. त्यामुळे बंद पडलेली स्वच्छता मोहीम पुन्हा सुरु करण्यासाठी आयुक्तांनी आदेश जारी केला आहे. त्यासाठी प्रत्येकाने आठवड्यातील दोन तास याप्रमाणे वर्षातील किमान १०० तास श्रमदान करण्याचे फर्मान सोडण्यात आले.
राज्य शासनाने महाराष्ट्र स्वच्छता अभियानांतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी २७ हजारांचे अनुदान दिले आहे. या अनुदानातील ६ हजार रु.चा पहिला हप्ता सुमारे ६०० लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. ही कामे सुरु झाली की नाही, त्याची पाहणी करण्याचा आदेशही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.