Join us

उत्पादक कंपनीच्या नावे तुम्हालाही कोणी रेमडेसिविर देत असेल तर सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:06 AM

सायबर पोलिसांचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : समाजमाध्यमांवर नामांकित उत्पादक कंपनीच्या नावाने गरजू व्यक्तींना रेमडेसिविर आणि टॉसिलीझुमॅब ...

सायबर पोलिसांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : समाजमाध्यमांवर नामांकित उत्पादक कंपनीच्या नावाने गरजू व्यक्तींना रेमडेसिविर आणि टॉसिलीझुमॅब औषध मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नियमानुसार कुठलीही उत्पादक कंपनी थेट ग्राहकांना या औषधांचा पुरवठा करू शकत नाही, त्यामुळे अशा कॉल, जाहिरातींपासून सावध राहा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचे संकट वाढत आहे. दुसरीकडे या आजारावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिविर, टॉसिलीझुमॅब इंजेक्शनची साठेबाजी, काळाबाजार केला जात आहे. रुग्णांचे नातेवाईक या इंजेक्शनसाठी वणवण भटकत आहेत. त्यांच्या गरजेचा गैरफायदा घेत काहीजण विविध प्रकारे नागरिकांची फसवणूक करत आहेत. यात सिप्ला फार्मा कंपनीसारख्या नामांकित उत्पादक कंपनीच्या नावाने सोशल मीडियावर रेमडेसिविर आणि टॉसिलीझुमॅब अशी कोरोनासाठी उपयुक्त ठरणारी औषधे उपलब्ध करून देण्याच्या जाहिराती देण्यात येत आहेत. यात संबंधित व्यक्ती कधी स्वतःला पुरवठादार तर कधी कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगतात.

सावज जाळ्यात येताच त्यांना खात्यावर पैसे भरण्यास भाग पाडले जाते. पैसे मिळताच हे ठग नॉट रिचेबल होतात. सिप्ला फार्मा कंपनीने याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. अशा फसव्या जाहिरातींना बळी पडू नका. संदेशासोबत येणारी लिंक उघडू नका. त्याखाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नका, असे आवाहन मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने केले आहे.

* जाहिरातींना फसू नका

कुठलीही उत्पादक कंपनी थेट ग्राहकांना रेमडेसिवीर आणि टॉसिलीझुमॅब औषध देऊ शकत नाही. नियमानुसार, संबंधित कंपनी हे औषध सरकारी रुग्णालय, खासगी रुग्णालय यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उपलब्ध करुन देऊ शकते. अशा जाहिराती नजरेत पडल्यास फसू नका, जवळच्या पोलीस ठाण्यातील सायबर सेल विभागाला याबाबत माहिती द्या, असे आवाहन मुंबई पाेलिसांच्या सायबर विभागाने केले आहे.

.............................................