दिवाळीत फटाके फोडाल तर खबरदार; महापालिका आणि पोलिसांकडून हाेणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 01:54 AM2020-11-10T01:54:13+5:302020-11-10T07:01:03+5:30
काेराेना रुग्णांना हाेऊ शकताे त्रास
मुंबई : कोरोना रुग्णांमध्ये श्वसनाची मुख्य समस्या असते. त्यांची प्राणवायू पातळी खालावण्याची शक्यता असते, शिवाय फटाक्यांच्या धुराचा त्यांना त्रास होऊ शकतो, हे लक्षात घेऊन दिवाळीत मुंबईत फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी खासगी परिसरांमध्ये फुलझडी, अनार असे साैम्य फटाके फोडण्यास परवानगी आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास महापालिका व पोलीस यांच्याद्वारे संयुक्तपणे कडक कारवाई करण्यात येईल.
कोरोनाची संसर्गजन्यता अधिक असल्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी सामाजिक अंतर कटाक्षाने पाळणे, सार्वजनिक ठिकाणी आवर्जून मास्क घालणे, वारंवार साबणाने व्यवस्थित हात धुणे आदी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी खासगी परिसरांत फुलझडी, अनार असे साैम्य फटाके फोडण्यास परवानगी आहे.
प्रशासनाकडून आवाहन
दिवाळीच्या काळात सामाजिक अंतर राखा.
फराळासाठी नातेवाइकांच्या घरी जाणे शक्यताे टाळा.
दिवाळीच्या शुभेच्छा दूरध्वनीद्वारे, दृकश्राव्य माध्यमांद्वारे द्या.
भाऊबिजेच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळताना शक्यतो दृकश्राव्य प्रणालीद्वारे ओवाळावे.
भावानेही ऑनलाइन पद्धतीनेच ओवाळणी द्यावी.