- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : निवासी इमारतीच्या आवारातील विहीर व नळाचे पाणी खासगी टँकर्सला विकणे आता सोसायट्यांना चांगलेच महागात पडणार आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अशा सोसायट्यांवर बेस्ट उपक्रमाने धाड टाकून १८ लाख रुपये दंड वसूल केला आहे. दक्षिण मुंबईतील अशा ११ निवासी सोसायटी व धर्मदाय संस्थांना हा दंड करण्यात आला आहे.निवासी सोसायट्यांतून मिळवलेले पाणी टँकर्सचालक टंचाई असलेल्या विभागात दामदुप्पट रकमेत विक्री करतात. विशेष म्हणजे, व्यावसायिक वापरासाठी इमारतीच्या निवासी विद्युत मापकाद्वारे पाणी घेतले जाते. काळबादेवी आणि धोबीतलाव परिसरात अशा पाणीचोरीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नियमानुसार यासाठी व्यावसायिक वीजमीटर वापरणे बंधनकारक आहे. मुंबईतील बऱ्याच टँकर्सचालकांकडे व्यावसायिक मीटर आहेत.तरीही टँकर्सचालकांनी वीजबिल चुकवण्यासाठी निवासी वीजमापकांचा वापर करू नये, याकरिता बेस्टचे अधिकारी नियमित टँकर्सचालकांची तपासणी करीत असतात. माहिती अधिकार कार्यकर्ते एस. पी. धोका यांनी टँकर्सचालकांची चोरी उघडकीस आणली. त्यानुसार, बेस्टने ११ ठिकाणी छापे मारून दंड वसूल केला. यापैकी दोन सोसायट्यांनी ७० हजार रुपये दंड भरला आहे. उर्वरित नऊ जणांची दंडाची रक्कम अद्याप जमा झालेली नाही.ना हरकत प्रमाणपत्र आवश्यकराष्ट्रीय हरित लवादाने नुकत्याच एका सुनावणीत, धोबी तलावाच्या तीन नागरिकांना जगन्नाथ शंकरशेट मार्गावरील कूपनलिकेतून पाणी उपसण्यास मनाई केली आहे. महापालिका, केंद्रीय भूजल प्राधिकरण, राज्य भूजल प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच, या नागरिकांना पाणी उपसता येणार आहे, तेही बेस्टकडील व्यावसायिक वीजमीटर घेतल्यानंतर.मुंबई शहर आणि उपनगरातील झोपड्यांमध्ये पाण्याची कमतरता असते. विशेषत: आजही पूर्व उपनगरातील झोपडीधारकांना पाण्यासाठी महापालिकेसोबत संघर्ष करावा लागत आहे. असे असतानाही विकासकांना टँकर्सद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, महापालिका अशा टँकर्सवर कारवाई करत नाही. परिणामी, दिवसाढवळ्या टँकर्सचालकांना पाण्याची विक्री होत असते.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरातील अशा टँकर्सची संख्या सुमारे दहा हजारांहून अधिक असून, पश्चिम उपनगरात अशा टँकर्सची संख्या अधिक आहे. या प्रकरणी महापालिकेकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. परंतु महापालिकेकडून काहीच कारवाई करण्यात आलेली नाही.मुंबईला होणाऱ्या पाणीपुरवठ्यापैकी ७00दशलक्ष लीटर पाणी गळतीमुळे वाया जाते; तर १६0दशलक्ष लीटर पाणी टँकर लॉबीकडून चोरी केली जाते. मुंबईमध्ये पाण्याची चोरी करणाऱ्या टँकर्सची संख्या सुमारे १० हजार आहे, असे जलतज्ज्ञांनी सांगितले.एकीकडे टँकर्सचालकांना पाण्याची विक्री केली जात असतानाच दुसरीकडे मुंबईला केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठयाच्या सुमारे ३० टक्के म्हणजेच प्रतिदिन९०० दशलक्ष लिटर्स पाण्याचा अंदाजित अपव्यय होतो.सध्या मुंबईची लोकसंख्या सुमारे सव्वाकोटी आहे. आणि २०३१ सालापर्यंत पाण्याची अंदाजित मागणी प्रतिदिनी ६ हजार दशलक्ष लिटर्स एवढी असणार आहे. मुंबईकरांकडून समुद्रात दररोज ७७४दशलक्ष लिटर सांडपाणी सोडले जात आहे. दुर्देव म्हणजे समुद्रात सोडल्या जाणाऱ्या या सांडपाण्यावर महापालिका कोणत्याही प्रकाराची प्रक्रिया करत नाही.