काेविड लसीबाबत ऑनलाइन माहिती मिळवत असाल तर सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:07 AM2020-12-24T04:07:21+5:302020-12-24T04:07:21+5:30
ठगांकडून हाेऊ शकते फसवणूक : सायबर पोलिसांकडून नियमावली जारी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या काळात राज्यभरात सायबर गुन्हेगारीत ...
ठगांकडून हाेऊ शकते फसवणूक : सायबर पोलिसांकडून नियमावली जारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या काळात राज्यभरात सायबर गुन्हेगारीत १७ टक्क्यांंनी वाढ झाली आहे. अशात, येणाऱ्या काेविड - १९ लसीबाबतही ठगांकडून फसवणुकीचे जाळे पसरविण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करीत, महाराष्ट्र सायबर विभागाने नियमावली जारी केली.
इंटरपोलकडूनही अशा प्रकारे खोट्या जाहिराती आणि माहितीच्या आधारे लस देण्याच्या नावाखाली संघटित टोळ्यांकडून फसवणूक होऊ शकते, याबाबत सावधानता बाळगण्याचा इशारा देण्यात आल्याने सायबर विभागाने यासंदर्भात नियमावली जारी केली. यात, सायबर ठग सोशल मीडिया तसेच बनावट संकेतस्थळावरून कोविड - १९ लसीबाबत खोटी माहिती देत विश्वास संपादन करू शकतात. सरकारकडून येणाऱ्या लसीकरणासाठीच्या ॲडव्हान्स बुकिंगच्या नावाखाली नागरिकांना आर्थिक फटका बसू शकतो किंवा चुकीचे औषध मिळू शकते.
सायबर ठग स्वतःला वैद्यकीय कर्मचारी, संस्थेचे समाजसेवक असल्याचे सांगून लसीकरण करून घेण्यासाठी प्रवृत्त करू शकतात. त्यामुळे अशा कॉल आणि व्यक्तींपासूनही सावध राहण्याच्या सूचना सायबर विभागाने दिल्या आहेत.
* लिंक ओपन कराल तर फसाल
शासनाच्या नावसाधर्म्य असलेल्या फसव्या लिंक तयार करून ऑनलाइन भामट्यांनी यापूर्वी फसवणुकीचे प्रयत्न सुरू केले आहेत. ते पुढेही करू शकतात. लसीबाबत माहितीच्या नावाखाली फसवणूक करणारे मेल, संदेश पाठविण्यात येतील. कुतूहलापोटी त्याखालील लिंक डाऊनलोड केल्यास मालवेअर किंवा व्हायरसद्वारे भ्रमणध्वनी, संगणकाचा ताबा घेऊन त्यातील संवेदनशील माहिती ठग मिळवतील. त्याआधारे आर्थिक फसवणूक, माहितीची चोरी, बदनामी किंवा अन्य गुन्हे घडू शकतात. त्यामुळे लिंक ओपन कराल तर फसाल. अशा लिंकवर क्लिक करू नका. अनोळख्या संकेतस्थळावरून लसीच्या खरेदीबाबत विचार करू नका, असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले.
* अधिकृत लसीकरणालाच प्राध्यान्य द्या
शासनाच्या अधिकृत आणि नियमानुसार देण्यात येणाऱ्या लसीकरणालाच प्राधान्य द्या. कुणालाही बँक तपशील शेअर करू नका, असे सायबर विभागाने जारी केलेल्या नियमावलीत नमूद केले आहे.
..............................