होळीसाठी झाडे तोडाल तर खबरदार!, महापालिकेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 02:09 AM2018-02-28T02:09:51+5:302018-02-28T02:09:51+5:30
रस्त्याच्या आजूबाजूची, सार्वजनिक परिसरातील तसेच खाजगी आवारातील झाडे होळीत जाळण्यासाठी तोडली जातात. यंदा मात्र अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महानगरपालिका सज्ज झाली आहे.
मुंबई : रस्त्याच्या आजूबाजूची, सार्वजनिक परिसरातील तसेच खाजगी आवारातील झाडे होळीत जाळण्यासाठी तोडली जातात. यंदा मात्र अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महानगरपालिका सज्ज झाली आहे. महापालिकेच्या उद्यान खात्यातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी होळीच्या अनुषंगाने अधिक सतर्क राहावे तसेच अनधिकृतपणे वृक्षतोड केल्याचे आढळल्यास संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करावी,
असे आदेश महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिले आहेत.
त्याचबरोबर नागरिकांनीदेखील पर्यावरणपूरक पद्धतीने प्रतीकात्मक होळी साजरी करावी, असेही आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५च्या कलम २१मधील तरतुदींनुसार वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही झाड तोडणे किंवा तोडण्यासाठी कारणीभूत होणे, हा अपराध आहे. त्यासाठी शिक्षेची तरतुदही आहे.
होळीत जाळण्यासाठी झाडे तोडली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे झाडांची संख्या कमी होते आणि पर्यावरणालाही हानी पोहोचते. परिणामी, होळीला झाडे तोडली जाणार नाहीत, याची खबरदारी घेण्यासाठी महापालिकेच्या उद्यान खात्यातील संबंधित अधिकारी व कर्मचाºयांनी सतर्क राहावे. अनधिकृतपणे वृक्षतोड केल्याचे आढळल्यास संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करावी, असे आदेश महापालिकेतर्फे देण्यात आले आहेत. दुसरीकडे होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये, यासाठी होळी पेटविताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेत, होळीचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
होळी पेटविताना खबरदारी घ्या -
होळी पेटविताना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहित्रे नाहीत याची खातरजमा करून घ्या, अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जिवंत तार खाली पडून भीषण अपघात होण्याची शक्यता असते.
अनेक ठिकाणी वीजवाहिन्या या भूमिगत असल्याने, त्यापासून लांब अंतरावरच होळी पेटवावी जेणेकरून होळीच्या उष्णतेपासून भूमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील.
होळी पेटविताना शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करा,
ट्रक किंवा इतर वाहनांतून
होळी आणताना होळीचा
स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही याची खबरदारी घ्या.
..तर एका वर्षापर्यंत कारावास-
अपराधाकरिता कमीतकमी १ आठवडा ते १ वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसेच यासाठी कमीतकमी १ हजार ते ५ हजार रुपये दंड होऊ शकतो.
हे लक्षात घेता महापालिका क्षेत्रात अशा प्रकारची वृक्षतोड होऊ नये, यासाठी उद्यान खात्यातील उपउद्यान अधीक्षक, कनिष्ठ वृक्ष अधिकारी, उद्यान विद्या सहायक यांनी अधिक सतर्क राहावे व अधिक सजगपणे आपली कर्तव्ये पार पाडावीत, असे आदेश जितेंद्र परदेशी यांनी दिले आहेत.
नियमबाह्य पद्धतीने वृक्षतोड होत असल्याचे आढळून आल्यास त्याबाबत संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू करावी, असेही आदेश परदेशी यांनी विशेष परिपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना दिले आहेत.