Join us

गुप्तहेरांची मदत घेत असाल तर सावधान; हाेऊ शकते मोठी फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 4:49 AM

४00 व्यक्तींचे सीडीआर, ५ लाख जणांचे पत्ते गुप्तहेरांच्या हाती; गुन्हे शाखेच्या चौकशीत उघड, ७ जणांना अटक

मुंबई : नागरिकांच्या वैयक्तिक आणि गोपनीय माहितीची (सीडीआर, एसडीआर) विक्री करणाऱ्या खासगी गुप्तहेरांचा पर्दाफाश करत गुन्हे शाखेने ७ जणांना अटक केली. अटक आरोपींच्या चौकशीत देशभरातील ४०० व्यक्तींचे सीडीआर आणि तब्बल ५ लाख व्यक्तींचे पत्ते त्यांच्याकडे सापडले. बहुतांश प्रकरणात पती-पत्नीचे विवाहबाह्य संबंध, लग्न जुळवण्याआधी वधू-वराची चारित्र्य पडताळणी यासाठी या खासगी गुप्तहेरांची मदत घेण्यात आल्याचे समाेर आले आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ५ ला याबाबत माहिती मिळताच पथकाने त्यांच्या एका पोलिसाला गिऱ्हाईक म्हणून टोळीच्या सदस्यांकडे पाठवले. सर्वांत आधी गिऱ्हाईक बनून गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची ओळख डिटेक्टिव्ह शैलेश मांजरेकर आणि राजेंद्र साहू यांच्याशी झाली. या टोळीला रंगेहाथ अटक केल्यानंतर यांच्याकडून पेन ड्राइव्ह, लॅपटॉप, सीडीआर आणि एसडीआर पोलिसांनी जप्त केले. त्याआधारे त्यांनी मुंबईतील ‘असेन्ट’ या ‘डिटेक्टिव्ह एजन्सी’चा प्रमुख शैलेश मांजरेकर यालाही अटक केली. चौकशीत यांचे जाळे फक्त मुंबईपुरतेच मर्यादित नसून, देशभरात असल्याचे उघड झाले. यात, देशाच्या विविध राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये यांचे दलाल सक्रिय असून अशा प्रकारे गैरमार्गाने ही माहिती काढण्याचे काम ते करत हाेते. त्यात देशभरातील गुप्तहेरांना त्यांच्या गरजेनुसार सीडीआर, एसडीआर पुरवणाऱ्या सौरभ साहू या तरुणाचे नाव पुढे आले. साहूकडून असे तपशील मिळवणाऱ्या उत्तर प्रदेश, ओडिशा, कर्नाटक राज्यांतील गुप्तहेरांबाबतही माहितीही तपासात गुन्हे शाखेच्या हाती लागली आहे. त्यानुसार, साहूसह अन्य पाच जणांना अटक करण्यात आली असून अधिक चाैकशी सुरू आहे. १५ तारखेपर्यंत सुनावली पोलीस कोठडी आठवी पास साहू  गाजियाबादमध्ये राहतो. ही टोळी या कामाव्यतिरिक्त लोकांचे बँक अकाउंट डिटेल्सही काढून देत होती. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि विविध बँकांचे पासबुक, चेकबुकही पोलिसांनी जप्त केले. अटक आरोपींकडे देशभरातील सुमारे ४०० व्यक्तींचे सीडीआर आणि ५ लाख व्यक्तींचे पत्ते, अन्य वैयक्तिक तपशील सापडले. साहू दिल्लीतून ही माहिती गोळा करत होता. अटक आरोपींना १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ५ ते ४० हजार रुपयांत माहितीएका सीडीआरसाठी ४० हजार रुपये, तर एका एसडीआरसाठी कमीत कमी ५ हजार रुपये या टोळीकडून घेतले जात होते. समोरच्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार याचे भाव ठरत होते.साहूला यापूर्वीही अटकठाणे पोलिसांनी काही वर्षांपूर्वी देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना अशाच प्रकरणात अटक केली होती. तेव्हा त्यांच्यासोबत साहूलाही अटक करण्यात आल्या होत्या.