Join us

धूम्रपान कराल तर खबरदार !

By admin | Published: September 22, 2014 1:33 AM

रेल्वे किंवा परिसरात ज्वलनशील पदार्थ नेण्यास मनाई असतानाही अनेक प्रवासी सर्रासपणे सिगारेट किंवा विडी ओढताना दिसत आहेत

मुंबई : रेल्वे किंवा परिसरात ज्वलनशील पदार्थ नेण्यास मनाई असतानाही अनेक प्रवासी सर्रासपणे सिगारेट किंवा विडी ओढताना दिसत आहेत. अशा प्रवााशांविरोधात पश्चिम रेल्वेकडून कारवाई करण्यात आली आहे. गेल्या आठ महिन्यांत चर्चगेट ते डहाणूदरम्यान ९०६ प्रवाशांना पकडण्यात आले असून, त्यांच्यावर केलेल्या दंडात्मक कारवाईतून ९२ हजार ८५० रुपये दंड वसूल केला गेला आहे. लोकल किंवा लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून किंवा स्थानकांवर सिगारेट किंवा विडी ओढण्यास मनाई आहे. मुळात ज्वलनशील पदार्थांवर रेल्वेकडून बंदीच घालण्यात आली असून, अशा प्रवाशांविरोधात कठोर कारवाईच केली जाते. त्याचप्रमाणे ज्वलनशील पदार्थ सोबत घेऊन जाऊ नये, असे आवाहनही केले जाते. तरीही त्याकडे दुर्लक्ष करीत अनेक जण नियम मोडताना दिसतात. अशा धूम्रपान करणाऱ्या प्रवाशांविरोधात गेल्या आठ महिन्यांत पश्चिम रेल्वेकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. धूम्रपानाचे प्रमाण कमी व्हावे म्हणून केंद्र सरकारकडून नियमावली बनवली जात असतानाच पश्चिम रेल्वेकडून अशा प्रवाशांविरोधात फास आवळण्यास सुरुवातच केली आहे. आठ महिन्यांत चर्चगेट ते डहाणूदरम्यान ९०६ जणांना धूम्रपान करताना पकडण्यात आले असून, त्यांच्यावर कलम १६७ अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. हा दंड २०० रुपये इतका आकारला जातो. या प्रवाशांविरोधात केलेल्या दंडात्मक कारवाईतून ९२ हजार ८५० रुपये दंड वसूल केला गेला आहे. त्याचप्रमाणे मुंबई सेंट्रल ते सुरत या लांब पल्ल्याच्या मार्गावर ९४० जणांना धूम्रपान करताना पकडले असून, ९६ हजार ५० रुपयांचा दंड वसू२ल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)