रस्त्यावर थुंकाल तर खबरदार, पालिका आक्रमक :
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 06:52 AM2021-02-06T06:52:49+5:302021-02-06T06:53:22+5:30
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून २०० रुपये दंड वसूल करण्यात येतो. मास्क न लावण्याबरोबच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासही मनाई आहे.
मुंबई : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून २०० रुपये दंड वसूल करण्यात येतो. मास्क न लावण्याबरोबच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासही मनाई आहे. सप्टेंबर २०२० ते २ फेब्रुवारी २०२१ या सहा महिन्यांच्या कालावधीत रस्त्यावर थुंकणाऱ्या तब्बल आठ हजार ५२३ लोकांकडून १६ लाख ७४ हजार रुपये दंड मुंबई पालिकेने वसूल केला.
सार्वजनिक परिसर अस्वच्छ करणे, रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर पालिकेच्या क्लीन अप मार्शल्समार्फत कारवाई हाेते. काेराेनामुळे तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. हा नियम मोडणाऱ्यांवर एप्रिलपासून कारवाई सुरू आहे. त्याचबरोबर खोकणे व रस्त्यावर थुंकणे यामुळेही कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका असल्याने पालिकेने अशा लोकांविरोधात कारवाई तीव्र केली. आतापर्यंत सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणाऱ्या १२ लाख ९४ हजार ३१२ लोकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून तब्बल २६ कोटी २४ लाख ९२ हजार रुपये दंड पालिकेने वसूल केला.
कुर्ला, गोवंडी, चेंबूर येथील एक हजार ६२० लोकांकडून तीन लाख नऊ हजार चारशे रुपये दंड वसूल केला, तर मुलुंड, भांडुप व घाटकोपर येथून सर्वांत कमी ९१६ लोकांकडून एक लाख ७३ हजार दंड वसूल करण्यात आला.