‘त्या’ मेसेजपासून सावधान; बीएसएनएलचा ग्राहकांना इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:07 AM2021-03-17T04:07:15+5:302021-03-17T04:07:15+5:30
मुंबई : बीएसएनएलच्या नावे बनावट मेसेज पाठवून फसवणूक होत असल्याच्या तक्रारी सध्या वाढल्या आहेत. परंतु, असा कोणताही मेसेज आमच्याकडून ...
मुंबई : बीएसएनएलच्या नावे बनावट मेसेज पाठवून फसवणूक होत असल्याच्या तक्रारी सध्या वाढल्या आहेत. परंतु, असा कोणताही मेसेज आमच्याकडून पाठविण्यात आला नसून, ग्राहकांनी ऑनलाइन चोरट्यांपासून सावध राहावे, असे आवाहन बीएसएनएलने केले आहे.
बीएसएनएल ग्राहकांनी तत्काळ ‘केवायसी’ पूर्ण न केल्यास त्यांचे सीम कार्ड बंद होईल, अशा आशयाचा मेसेज मोबाइलवर पाठविला जातो. केवायसी पूर्ण करण्यासाठी मेसेजमध्ये दिलेल्या क्रमांकावर कागदपत्रे पाठविण्यास सांगितले जाते. ग्राहकांनी आपली माहिती संबंधित क्रमांकावर पाठविल्यानंतर त्यांच्या खात्यातून पैसे काढले जातात, अशी या ऑनलाइन चोरट्यांची कार्यपद्धती असल्याचे बीएसएनएलकडून सांगण्यात आले.
परंतु, बीएसएनएलकडून ग्राहकांना असा कोणताही मेसेज पाठविण्यात आलेला नाही. ग्राहकांना असा मेसेज आला असल्यास संबंधित क्रमांकावर कोणतीही माहिती पाठवू नये, असे आवाहन बीएसएनएलच्या वतीने करण्यात आले आहे.