मुंबई : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, गुन्हेगार नागरिकांना लक्ष्य करत, त्यांच्या बँक खात्यांतील कोट्यवधींची रक्कम काढून घेत आहेत. मात्र, काही मुंबईकरांनी वेळीच सतर्कता बाळगत अशा भामट्यांना ठेंगा दाखविला आहे. यांपैकी काहीजणांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली, तर नुकसान न झाल्याने अनेकांनी तक्रार देणे टाळले. ४,७६५ पैकी १,००० गुन्ह्यांची उकलगेल्या महिन्यात फिशिंग, पॉर्नोग्राफी, अश्लील मेल, फेक सोशल मीडिया प्रोफाइल, क्रेडिट कार्ड, ऑनलाइन कार्ड, हॅकिंग, कस्टम गिफ्ट, नोकरी शॉपिंग, मॅट्रीमोनिअल साइट, गुंतवणूक, क्रिप्टो करन्सी, लोन यांसारख्या चार हजार ७६५ गुन्ह्यांची नोंद मुंबई पोलिसांकडे झाली आहे. त्यांपैकी जवळपास एक हजार गुन्ह्यांची उकल झाल्याची आकडेवारी प आहे.सायबर फसवणुकीची येथे नोंदवा तक्रारसायबर गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर तसेच १९३० या क्रमांकावर कॉल करावा.
व्हिडीओ कॉलवर नको, पोलिस ठाण्यात या!दहिसर पोलिसांच्या हद्दीत राहणाऱ्या महिलेला सायबर भामट्यांनी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे तसेच क्राइम ब्रँचचे अधिकारी म्हणून फसवण्याचा प्रयत्न केला.व्हिडीओ कॉलवर आपली चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगताच तिने पोलिस ठाण्यात येण्याची तयारी दर्शवत ‘तेथेच प्रश्न विचारा,’ असे उत्तर दिले. त्यामुळे भामट्यांनी फोन कट केला.
वडिल भेटले कुठे तुम्हाला?मालाडच्या एका महिलेला अनोळखी व्यक्तीने फोन करत तुमच्या वडिलांनी ३० हजार रुपये पाठवायला सांगितल्याचे म्हटले. मात्र, १५ वर्षांपूर्वी निधन झालेले वडिल तुम्हाला कुठे भेटले? असे तिने विचारताच भामट्याने फोन कट केला.
स्कॅमरसमोर पाळीव श्वानपोलिसाच्या वेशातील स्कॅमरने अंधेरीतील एका व्यक्तीला फोन केला. त्यावेळी त्या व्यक्तीने स्वत: कॅमेऱ्यासमोर न येता त्यांच्या पाळीव श्वानाला कॅमेऱ्यासमोर ठेवून समोरील स्कॅमरशी संवाद साधला. स्कॅमरने अनेकदा त्यांना कॅमेऱ्यासमोर येण्याची गळ घातली. त्यावर ती व्यक्ती आपण कॅमेऱ्यासमोर आलो आहोत, असे सांगून वारंवार आपल्या श्वानाला दाखवत होती.
ओटीपीसाठी १० फोन प्लॅटिनम क्रेडिट कार्ड रद्द करायचे असल्याचे गोरेगावमधील तरुणाने सांगताच भामट्यांनी त्याला ओटीपी शेअर करण्यासाठी १० फोन केले. अखेर त्याने भामट्यांना पोलिस ठाण्याजवळ भेटायला बोलावल्यानंतर हे फोन बंद झाले.अशी बाळगा सतर्कता -स्ट्राँग पासवर्ड वापरा-सॉफ्टवेअर अपडेट करा-वायरलेस नेटवर्क सुरक्षित करा-डेटा बॅकअप ठेवा -अँटिव्हायरस सॉफ्टवेअर वापरा-सोशल मीडिया सेटिंग्ज खासगी ठेवा-स्पॅम ई-मेल किंवा लिंक क्लिक करू नका.
मी मेसेज केलाच नाही!गेल्या वर्षी मे महिन्यात बीकेसीमध्ये जिओ वर्ल्ड ड्राइव्ह येथे मनीष मित्तल (४७) या टेक्नॉलॉजी रिलायन्स ब्रँडचे सीनिअर व्हाइस प्रेसिडेंट यांचा फोटो डीपीवर ठेवत कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर दर्शन मेहता (६५) यांना गिफ्ट कार्ड पाठवण्याचा मेसेज अनोळखी व्यक्तीने केला. मात्र, त्यांनी मित्तल यांना फोन केला असता तो फेक मेसेज असल्याचे उघड झाले.