Join us

रंगपंचमी खेळतांना घातक रंगापासून सावधान राहा

By मनोहर कुंभेजकर | Published: March 05, 2023 3:42 PM

आपण पहिल्या दिवशी होळी दहन करतो  आणि दुसऱ्या दिवशी धूलिवंदन एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळतो.

मुंबई-आपण पहिल्या दिवशी होळी दहन करतो  आणि दुसऱ्या दिवशी धूलिवंदन एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळतो. ‘बुरा ना मानो होली है’ म्हणत गुलालाने एकमेकांना रंगवतो आणि नाचत गाजत होळी खेळतो. होळी आणि पुरणपोळी हे उत्तम समीकरण आहे.  रंगांचा सण उत्साहाची, आनंदाची  आणि एकमेकांना जोडण्याची संधी घेऊन येतो.

होळी हा रंगांचा सण आहे, परंतू रंगपंचमी खेळतांना सावधानता पाळणे अधिक गरजेचे आहे. कारण आजकाल मिळावटवाल्या रंगामुळे खूप नुकसानाना सामोरे जावे लागते. रंगांमध्ये वापरल्या जाणार्‍या रसायनांबद्दल जागरूकता निर्माण करणे खूप महत्वाचे आहे. होळीच्या रंगांमध्ये औद्योगिक रसायनांचा वापर वाढल्याने धोका निर्माण झाला आहे.काळे, लाल, गुलाबी, हिरवे, निळे  या गडद रंगांमध्ये हानिकारक रसायने जास्त प्रमाणात असतात.  घातक रंगांचा वापर केल्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे  रंगापासून सावधान- बुरा ना मानो होली है असा एल्गार करत होळीचे रंग जपून निवडा.

असे आवाहन औषध निर्माण तज्ज्ञ डॉ महेश अभ्यंकर यांनी रंगपंचमी खेळणाऱ्या तमाम नागरिकांना केले आहे. होळीचा सण साजरा करा, पण त्वचा, डोळे, श्वसन मार्ग याना रंगाने इजा होणार नाही याची काळजी घ्या तरच होळीचा आनंद द्विगुणित होईल” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

होळीच्या रंगांमध्ये जड धातू, रसायने आणि कीटकनाशके यांसारख्या हानिकारक पदार्थांच्या संपर्कात आल्याने त्वचा, डोळे आणि श्वसनसंस्थेवर घातक परिणाम होऊ शकतात. सेंद्रिय आणि केमिकल-मुक्त रंगांचा वापर केल्याने यापैकी बहुतेक समस्या टाळण्यास मदत होऊ शकते असे मत डॉ महेश अभ्यंकर यांनी व्यक्त केले.

रंग निवडतांना काय करायचं?    नैसर्गिक सेंद्रिय किंवा घरगुती हर्बल रंग वापरा.    रासायनिक रंग अजिबात वापरू नका.    चांगल्या दर्जाचे आणि ब्रँडेड रंग खरेदी करा.    रंग पॅकेटवरील सूचना काळजीपूर्वक वाचा. 

त्वचेची काळजी कशी घ्याल

होळीच्या रंगामुळे त्वचेवर खाज सुटणे, जळजळ होणे, पुरळ उठणे इत्यादी समस्या होतात. 

    काळजी घेण्यासाठी ताबडतोब त्वचा सामान्य तापमानाला पाण्याने धुवा, जोपर्यंत रंग निघण्यास  सुरुवात होत नाही. रंग पूर्णतः निघून गेला पाहिजे.     रंगांमुळे होणारे नुकसान आणि कोरडेपणा कमी करण्यासाठी आणि त्वचेला पोषण देण्यासाठी नैसर्गिक तेल किंवा मोईज सारखे  मॉइश्चरायझिंग लोशन लावा.     जर चुकून स्वत:ला दुखापत किंवा जखम केली असेल, तर रंग काढून टाकण्यासाठी तुम्ही त्वचा अँटीसेप्टिक द्रावणाने स्वच्छ केल्याची खात्री करा.    त्वचेत अस्वस्थता आणि खाज सुटू लागली  ऍलर्जीविरोधी औषधे आवश्यक असू शकतात.    त्वचेच्या ऍलर्जी किंवा संसर्गाच्या बाबतीत, पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी आपल्या डॉक्टर किंवा त्वचा विशेषज्ञ यांचा सल्ला घेणे नेहमीच चांगले असते.कृत्रिम रंग जास्त काळ त्वचेवर राहिल्यास त्वचेच्या आतील थरापर्यंत पोहोचल्याने त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

रंग खेळतांना डोळ्यांची काळजी कशी घ्याल

चुकीच्या रंगामुळे डोळ्यांना हानी पोहचू शकते. डोळ्यांची जळजळ होणे, डोळे लालसर होणे, जास्त अश्रू येणे सुरु होते.

    डोळ्यातील रंग धुण्यासाठी आराम मिळेपर्यंत ते सामान्य पाण्याने धुवा.     सामान्य तापमानात पाणी वापरा आणि जास्त गरम किंवा थंड नको कारण त्यामुळे डोळ्यात जळजळ होऊ शकते.     डोळे चोळू नका कारण यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते.     जर अजूनही वाटत असेल की डोळे जळजळत आहेत आणि खाजत आहेत, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. 

उत्पादनांचे व्यापारीकरण आणि व्यावसायिक स्पर्धेमुळे पावडर होळीच्या रंगांच्या निर्मितीमध्ये हानिकारक रसायने आणि कृत्रिम पदार्थांचा वापर होऊ लागला आहे. ज्यामुळे स्वस्त पर्याय उपलब्ध झाला आहे. सावधानतेने एकमेकांना रंग लावावे. कोणाची इच्छा नसेल तर उगाच जबरदस्ती रंग लावू नये अशी भूमिका डॉ महेश अभ्यंकर यांनी विषद केली.