Join us

सावधान, मुंबईत पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:07 AM

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत आता पावसाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाला असतानाच याच काळात पावसाळी आजारांचे संकटदेखील मोठ्या ...

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत आता पावसाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाला असतानाच याच काळात पावसाळी आजारांचे संकटदेखील मोठ्या प्रमाणावर घोंगावते. जलप्रदूषणामुळे होणारे आजार मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता असते. अशा काळात मुंबई महापालिकेने गळक्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीवर भर देण्याची गरज असल्याचे जलतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुळात मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग आणि जलविभाग वर्षाच्या बारामाही जल शुद्धिकरणात अग्रेसर असतो. विविध स्तरावर पाण्याचे नमुने घेणे, तपासणे अशी कामे विविध टप्प्यांवर यशस्वीरीत्या केली जातात. गळक्या जलवाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीवर लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा मुंबईत पिण्याचे पाणीच आजाराचे कारण ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पाणी हक्क समितीचे निमंत्रक सीताराम शेलार यांनी सांगितले की, पावसाळ्याच्या अनुषंगाने पाहायचे झाल्यास पाण्याने होणारे जे आजार आहेत ते या काळात जास्त पसरतात. मुंबई महापालिकेचे याबाबत जे जाळे आहे ते अशावेळी मोठ्या वसाहती अथवा झोपड्यांपर्यंत पोहोचत नाही. शिवाय तुम्ही तुमच्या जलप्रदूषणाचा अथवा गळक्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करून घ्या, असे महापालिकेकडून लोकांना सांगितले जाते. जलवाहिन्यांची देखभाल दुरुस्ती होणे गरजेचे असते. मात्र ती होत नाही. बहुतांशी जलवाहिन्या या नाल्यांच्या अथवा गटारांच्या बाजूने वाहत असतात. मोकळ्या आणि गळक्या असलेल्या याच जलवाहिन्यांत नाल्यालगतचे अथवा गटरालगतचे दूषित पाणी शिरते. त्यानंतर जेव्हा पाणी येते तेव्हा जलवाहिन्यांच्या आत गेलेले घाण पाणी पुन्हा बाहेर फेकले जाते. यावर उपाय म्हणजे गळक्या जलवाहिन्या बदलणे होय. महापालिकेने ही जबाबदारी घेतली पाहिजे. जलवाहिन्या विकसित केल्या पाहिजे. तेव्हा कुठे दूषित पाण्याचा आणि आजाराचा प्रश्न निकाली लागेल.

कोरोनाचा परिणाम झाला

कोरोनाच्या पहिल्या सहा महिन्यांत पाण्याचे नमुने घेणे किंवा पाणी तपासणे यात काही अडचणी आल्या असतील. मात्र कोरोनाचा मुंबई महापालिकेच्या जलविभागाच्या कामावर काहीच परिणाम झालेला नाही. जलविभाग हा नेहमीच पूर्ण क्षमतेने काम करत आला आहे.

पाण्याच्या शुद्धतेत वाढ

उपाययोजनांमुळे मुंबईच्या पाण्याच्या शुद्धतेत ९९.३४ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. वरळी, करी रोड, शिवडी, मालाड, कांदिवली, जोगेश्वरी, पवई, साकीनाका, घाटकोपर, चेंबूर येथील झोपडपट्टीच्या भागातून पाण्याचे नमुने गोळा करून तपासण्यात आले होते. त्याअंती मुंबईतील पिण्याचे पाणी ९९.३४ टक्के शुद्ध असल्याचा दावा करण्यात आला होता.

दररोज ११० ते १३० ठिकाणांहून पाण्याचे नमुने

महापालिकेतर्फे दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो. त्यातून सेवा जलाशय व जलवितरण व्यवस्थेत निवडक ३५८ ठिकाणे पालिकेच्या जलविभागाने पाण्याचे नमुने गोळा करण्यासाठी निश्चित केलेले आहेत. त्यापैकी आरोग्य खाते व गुणनियंत्रण विभागाकडून दररोज ११० ते १३० ठिकाणांहून पाण्याचे नमुने गोळा करून आरोग्य खात्याच्या अखत्यारीतील प्रयोगशाळेत मेम्ब्रेन फिल्टर टेक्निक या अद्यावत व अचूक तंत्रज्ञानाने जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार तपासले जातात.

जलशुद्धीकरण केंद्र

मुंबईला हजार लिटर पाणी केवळ सव्वाचार रुपयांत मिळते. महापालिका याकरिता १२ ते १५ रुपये खर्च करते. पाणीपुरवठा असलेल्या जलस्त्रोतातून दररोज पाणी जवळपास ४०० किलोमीटर्स लांबीच्या जाळ्याद्वारे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत वाहून आणले जाते. पाणी शुद्धीकरण झाल्यानंतर हे पाणी भांडूप जलशुद्धीकरण केंद्र, पांजरापूर येथे साठवले जाते. त्यानंतर २७ जलाशयांमार्फत पाण्याचे शहर आणि उपनगरांत वितरण केले जाते.

पाण्याचा आढावा

पाणीपुरवठा करणारी यंत्रणा १८४५ सालापासून अस्तित्वात

गळतीचे प्रमाण २५ ते ४० टक्के.

८६२ ते १३०० दशलक्ष लिटर पाणी गळतीमुळे वाया.

प्रत्येक व्यक्तीला १५० लिटर पाण्याची गरज.

झोपड्यांमध्ये दरमाणसी दररोज ४० लिटरपेक्षाही कमी पाणी मिळते.

प्रत्यक्षात मात्र प्रतिदिन प्रतिव्यक्ती १३० लिटर पुरविण्याचे धोरण.

मुंबईची पाण्याची दररोजची मागणी चार हजार ४५० दशलक्ष लिटर.

मुंबईला दररोज तीन हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा.

- २०१३ : १४ ते २०१९ : २० या कालावधीत जीर्ण झालेल्या विविध व्यासाच्या २५० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या बदलण्यात आलेल्या आहेत.

- एक लाख ७५ हजार ठिकाणची गळती शोधून दुरुस्ती करण्यात आली आहे.

- विविध ठिकाणी कामे सुरू असताना रस्ते सुधार कार्यक्रमांतर्गत ८९ हजार ९०८ सेवा जोडण्या बदलण्यात आल्या.

मुंबईची लोकसंख्या

२०११ साली : १.२४ कोटी

२०२१ पर्यंत : १.३० कोटी

२०३१ पर्यंत : १.५० कोटी